पुणे : केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई उड्डान मंत्रिपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर मुरलीधर मोहोळ हे दिल्लीवरून पुण्यात दाखल झाले आहेत. शनिवारी सकाळी ते लोहगाव विमानळावर पोहोचले. याप्रसंगी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांसह महायुतीच्या कार्यकर्त्यांनी लोहगाव विमानतळावर मोहोळ यांचे जंगी स्वागत केले.
ढोल ताशा, हलगी आणि वारकऱ्यांच्या वेशातील मुलांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी कार्यकर्त्यांनी मोहोळ यांना खांद्यावर उचलून घेत त्यांना पुणेरी पगडी परिधान करून पुष्पहार घालून स्वागत केले. यावेळी उच्चशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, भाजपा शहर अध्यक्ष धीरज घाटे, माजी सभागृह नेते श्रींनाथ भिमाले, माजी नगरसेवक प्रवीण चोरबेले यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
दुसऱ्यांच्या स्वागतासाठी पुणे विमानतळावर येणाऱ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्यांच्या स्वागतासाठी आज ही गर्दी झाली, हे फक्त भारतीय जनता पार्टीतच होऊ शकते. मला आज खूप आनंद होत आहे अशी भावना व्यक्त करत मोहोळ यांनी शहरासह राज्यातील प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.