काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या नेत्यांनी वेगवेगळ्या पत्रकार परिषदा घेऊन पुणे महापालिकेत हमखास यश मिळेल, असा दावा केला आहे. पुणे महापालिकेत हे दोन्ही पक्ष काही ठिकाणी आघाडी करून, तर उर्वरित जागांवर मैत्रीपूर्ण लढत आहेत. कौल स्पष्ट असेलपुणे : सोशल मीडियाचा वापर करणाऱ्यांनी आपला कौल राष्ट्रवादीकडे दिला आहे. प्रत्यक्ष मतदानातूनही पुणेकर असाच स्पष्ट कौल देतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण यांनी व्यक्त केला. संपूर्ण प्रचार कालावधीत सोशल मीडियाच्या वापरात राष्ट्रवादी काँग्रेसच अग्रेसर असल्याचा दावा त्यांनी केला.पक्षाचे राज्य प्रवक्ते अंकुश काकडे, शहर उपाध्यक्ष अशोक राठी, कार्यालय चिटणीस शिल्पा भोसले, मनाली भिलारे आदी या वेळी उपस्थित होते.महापालिका निवडणुकीच्या जाहीर प्रचार समाप्तीच्या आधी काही तास पत्रकारांशी बोलताना चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच प्रचारात आघाडीवर राहिली असल्याचे सांगितले. त्या म्हणाल्या, ‘‘भारतीय जनता पक्षातील गुंडांचा प्रवेश, मुख्यमंत्र्यांची रद्द झालेली सभा, याचा सोशल मीडियाकडून मागोवा घेतला जात होता. अनेकजण त्यावर व्यक्त होत होते. त्यामुळेच या माध्यमांचा वापर करणाऱ्यांनी आपला कौल स्पष्ट केला, असे म्हणणे भाग आहे.’’ भाजपाच्या सर्व जाहिरातींमध्ये पंतप्रधान, मुख्यमंत्री अशांचीच छायाचित्रे वापरण्यात आली. फक्त राष्ट्रवादी काँग्रेसनेच निवडणुकीच्या होर्डिंग्जवर स्थानिक पदाधिकाऱ्यांची छायाचित्रे प्रसिद्ध केली, त्याचीही चर्चा सोशल मीडियात झाली. भाजपाच्या जाहिरातींमध्ये केंद्र व राज्य सरकारच्या योजना, त्यात पुण्यासाठी मात्र काहीच नाही व काय करणार तेही नाही, याबद्दलही सोशल मीडियावरून पुणेकरांनी नाराजी व्यक्त केली असल्याचे चव्हाण म्हणाल्या.मागील १० वर्षांत केलेली विकासकामे मतदारांसमोर मांडता आली. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विनाकारण आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसने सकारात्मक प्रचारावर भर दिला, असे चव्हाण यांनी सांगितले. (प्रतिनिधी)मागच्यापेक्षा अधिक यशपुणे : भारतीय जनता पक्षाने केवळ घोषणाबाजी केली असून, पुणे शहराच्या विकासासाठी गेल्या अडीच वर्षांत एक पैसाही आणला नाही़ त्यामुळे गतवेळेपेक्षा काँग्रेसला अधिक जागा मिळतील, असा विश्वास काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला़या वेळी माजी आमदार मोहन जोशी, दीप्ती चवधरी, गोपाळ तिवारी, अजित दरेकर, जया किराड, उपमहापौर मुकारी अलगुडे आदी उपस्थित होते़बागवे म्हणाले, की महापालिका निवडणुकीत प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर काही जागांवर आघाडी केली, तर अन्य ठिकाणी ते मैत्रीपूर्ण लढत देत आहेत़ काँग्रेसने ९६ उमेदवार उभे केले असून, दोघांना पुरस्कृत केले आहे़ काँग्रेसच्या उमेदवारांनी १० फेबु्रवारीला डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला वंदन करून, शपथ घेऊन भाजपाच्या लोकशाहीविरोधी कारभाराविरुद्ध घटनेचे संरक्षण करण्याचा निर्धार केला़ १२ फेब्रुवारीला माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते महात्मा फुले स्मारकाजवळ काँग्रेसच्या प्रचाराला प्रारंभ करण्यात आला़ माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते काँग्रेसचा वचननामा सादर करण्यात आला़ त्यात विविध २१ कलमी कार्यक्रमांद्वारे पुण्याच्या विकासाचे वचन देण्यात आले़ गेले दहा दिवस आजी-माजी आमदारांनी कोपरा सभा, पदयात्रांमध्ये सहभागी झाले़ काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी एकत्र पदयात्रा, कोपरा सभा केल्या़ नोटाबंदीमुळे महागाई वाढली असून, त्याचा झालेला त्रास सोशल मीडियाद्वारे लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला़ नोटाबंदी असतानाही भाजपाने २२०० कोटी रुपये जाहिरातीवर कसा खर्च केला, याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी करावा, अशी मागणी बागवे यांनी केली़ (प्रतिनिधी)
राष्ट्रवादी व काँग्रेसचा यशाचा दावा
By admin | Published: February 20, 2017 3:16 AM