धायरी (पुणे) : लॉटरी लागल्याचे सांगून ज्येष्ठ नागरिक महिलांच्या अंगावरील दागिने काढून घेण्याचे प्रकार शहरात अनेक घडले असताना अशा प्रकारे चोर्या करणार्या चोरट्याला ७० वर्षाच्या आजीमुळे पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. यावेळी नागरिकांनी त्याला चांगलाच चोप दिल्याने तो जखमी झाला आहे. साजीद अहमद शेख (रा. फातिमानगर, औरंगाबाद) असे या चोरट्याचे नाव असून तो पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. याप्रकरणी निंबाजीनगर येथे राहणार्या एका ७० वर्षाच्या महिलेने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना सनसिटी रस्त्यावरील सन एम्पायर सोसायटीमधील कात्रज मिल्क पार्लरमध्ये शुक्रवारी सकाळी नऊ ते पावणे दहा वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार या एका महिलेबरोबर सकाळी वॉकिंग करुन सन ऑरबीट सोसायटीच्या गेटजवळ बसल्या होत्या. त्यावेळी एक जण बुलेटवरुन आला. मी तुमच्या मुलाला ओळखतो. त्याला अडीच लाखांची लॉटरी लागली आहे, आमचे साहेब जवळच थांबले आहेत. तुम्हाला लॉटरीचे पैसे घेऊन देतो, असे सांगून त्यांना घेऊन तो सन एम्पायर सोसायटीमधील कात्रज मिल्क पार्लर दुकानाच्या मोकळ्या जागेत घेऊन आला. तेथे त्यांना खुर्ची आणून त्यावर बसण्यास सांगितले. तेव्हा या आजींना शंका आली. त्यांनी आपल्या नातेवाईकांना फोन करुन हा प्रकार सांगितले. त्यांनी तातडीने पोलिसांना ही बाब सांगितली.
सिंहगड रस्ता पोलीस तातडीने घटनास्थळी रवाना झाले. त्यादरम्यान चोरट्याने या आजींना दोन हात पुढे करण्यास सांगून त्यांच्या हातातील सोन्याच्या बांगड्या व गळ्यातील मंगळसुत्र जबरदस्तीने हिसकावून काढण्याचा प्रयत्न करु लागला. त्याला आजीने विरोध करुन आरडाओरडा केला. तेव्हा आजू बाजूला असलेल्या लोकांना हा प्रकार लक्षात आला. त्यांनी पुढे होत या चोरट्याला पकडले. तेव्हा तो दमदाटी करु लागल्यावर लोकांनी त्याला चांगलाच चोप दिला. तोपर्यंत पोलीस तेथे पोहचले. त्यांनी आरोपीला तत्काळ ताब्यात घेतले.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त सुहेल शर्मा, सहायक पोलिस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) जयंत राजुरकर, सहायक पोलिस निरीक्षक सचिन निकम,पोलीस उपनिरीक्षक गणेश मोकाशी, सहायक पोलिस उपनिरीक्षक आबा उत्तेकर, पोलीस कर्मचारी संजय शिंदे, अमित बोडरे, राजु वेंगरे, देवा चव्हाण, राहुल ओलेकर, शिवाजी क्षिरसागर, सागर शेडगे, अमोल पाटील, स्वप्नील मगर, दयानंद कांबळे, सुमित जगझाप, मनोज राऊत, योगेश उदमले यांच्या पथकाने केली आहे.
लॉटरी अन् गिफ्टच्या नावाखाली नागरिकांना लुटायचा...सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये व पुणे शहरत ब-याच ठिकाणी वृध्द महिलांना सकाळच्या वेळेमध्ये तुमच्या मुलाला लॉटरी लागली आहे, तुम्हाला गिफ्ट मिळाले आहे असे सांगुन गाडीवर बसवुन घेवुन जावुन थोडे अंतरावर नेवुन त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिणे जबरदस्तीने फसवणुक करून काढून घ्यायचा. या गुन्हयाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक सचिन निकम करीत असताना गुन्हयातील आरोपी अफताफ उर्फ साजीद अहमद शेख याच्याकडे सखोल तपास केला असता त्याने वारजे माळवाडी, निगडी, वाकड, देहुरोड, चंदननगर, कोंढवा पोलीस ठाण्यासह भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशाच पद्धतीने गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले असुन त्याच्याकडून एकुण ९ लाख ६२ हजार रुपयांचे सोन्याचे दागिणे तसेच एक लाख रुपये किंमतीची बुलेट असा एकुण १० लाख ६२ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.