आळेफाटा : येथील बाह्यवळण मोजणीला आज प्रशासनाच्या वतीने पोलीस बंदोबस्तात सुरुवात करण्यात आली. दरम्यान, याला विरोध करणाऱ्या दहा शेतकऱ्यांना प्रतिबंधक कारवाई म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतले.पुणे ते नाशिक महामार्गावर खेड ते सिन्नरदरम्यान होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील चौपदरीकरणाचे काम सध्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगाने सुरू आहे. या कामातील आळेफाटा येथे बाह्यवळण प्रस्तावित करण्यात आले आहे. मात्र, अगदी सुरुवातीपासूनच शेतकरीवर्गाने या बाह्यवळणाला विरोध केला आहे. २५ मार्च २०१३ रोजी ही मोजणी करू दिली नाही. १५ दिवसांपूर्वीही शेतकरीवर्गाने विरोध केला होता. या बाह्यवळणासंदर्भात आम्हाला केंद्र व राष्ट्रीय महामार्ग यांच्याकडे भूमिका मांडण्यासाठी वेळ द्यावा, अशी भूमिका शेतकरीवर्गाने घेतली.शेतकरी कृती समितीचे अनंतराव चौगुले, माजी सरपंच प्रदीप देवकर व इतर सदस्यांनी नुकतीच नवी दिल्ली येथे माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, खासदार दिलीप गांधी यांची भेट घेऊन त्यांना आळेफाटा परिसरातील बाह्यवळण रद्द करावे, अशी मागणी केली. आळेफाटा येथील शेतकरीवर्गाच्या यापूर्वी महामार्ग तसेच पिंपळगाव जोगा धरणाच्या कालव्याकरिता जमिनी गेल्या असून, शेतकऱ्यांच्या या मागणीचा विचार करावा, असे पत्र खासदार दिलीप गांधी यांनी परिवहनमंत्री नितीन गडकरी यांना दिले. यावर त्वरित कारवाई करण्यात येऊन अहवाल सादर करण्याचे आदेश राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांनी या पत्राला दिले. तसेच, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यासमवेत याबाबत परिवहनमंत्री नितीन गडकरी यांची पुढील आठवड्यात भेट घेण्याचे आश्वासन देण्यात आले. दरम्यान, आज मात्र प्रशासनाने आळेफाटा परिसरातील बाह्यवळण मोजणीला मोठ्या पोलीस बंदोबस्तात सुरुवात केली. या वेळी उपस्थित शेतकरीवर्गाने आक्षेप घेऊन तीव्रतेने पुन्हा एकदा विरोध केला. उपजिल्हाधिकारी संजय पाटील व तहसीलदार प्रल्हाद हिरामणी यांनी शासनाची भूमिका स्पष्ट केली. मात्र, शेतकरीवर्गाचाही विरोध होऊ लागल्याने अखेर पोलिसांनी गणेश गडगे, रघुनाथ मारुती चौगुले, तुळशिराम चौगुले, निवृत्ती गडगे, एकनाथ गडगे, विकास देवकर, एकनाथ शिरतर, ज्ञानेश्वर देवकर, अविनाश चौगुले, अतुल चौगुले या शेतकऱ्यांना प्रतिबंधक उपाय म्हणून ताब्यात घेतले. (वार्ताहर)
बंदोबस्तात मोजणी
By admin | Published: July 28, 2015 12:35 AM