पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात स्टुडंटस फेडरेशन ऑफ इंडिया आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. विद्यापीठातील मध्यवर्ती भागातील रीफेक्ट्री जवळ बुधवारी दुपारी हा प्रकार घडला. या घटनेत दाेन्ही विद्यार्थी संघटनांचे कार्यकर्ते जखमी झाले आहेत. याप्रकरणी चतु:श्रृंगी पाेलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) या संघटनेतर्फे रिफेक्ट्रीजवळ सभासद नोंदणी सुरू होती. यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) चे कार्यकर्ते तेथे दाखल झाले. सभासद नाेंदणीवरून कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची आणि मारहाण झाली. या घटनेची माहिती समजताच सुरक्षा रक्षकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मध्यस्थी करीत परिस्थिती नियंत्रणात आणली. मारहाणीच्या प्रकारात दाेन्ही संघटनांचे विद्यार्थी जखमी झाले आहेत. दरम्यान, काही वर्षांपूर्वी अभाविप आणि एसएफआय विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये जाेरदार हाणामारीचा प्रकार घडला हाेता.
एसएफआय तर्फे शांततेत सभासद नाेंदणीचा कार्यक्रम सुरू हाेता. अभाविपच्या कार्यकर्ते काेणतेही कारण नसताना घोळक्याने तेथे दाखल झाले आणि तुम्ही परवानगी घेतली का? आदी प्रश्न विचारून आम्हाला मारहाणीस सुरुवात केली. विद्यापीठाच्या सुरक्षा विभागाने सुरूवातीला बघ्याची भूमिका घेतली व नंतर मध्यस्ती केली असे एसएफआय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
विद्यापीठातील रिफेक्ट्री जवळ विद्यार्थी खिचडी खाण्यासाठी येत असतात. एसएफआयतर्फे जबरदस्तीने सभासद नाेंदणी केली जात हाेती. विद्यार्थ्याने त्यास नकार दिल्यानंतर विद्यार्थ्यांना मारहाण केली असल्याचे अभाविपने स्पष्ट केले.