राज्यात एकोपा गल्लीत दुरावा..! खराडीत राष्ट्रवादी-शिवसेनेत जुंपली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2021 03:07 PM2021-03-06T15:07:11+5:302021-03-06T15:17:58+5:30
राष्ट्रवादीच्या नगरसेवकाचे चितेवर झोपुन आंदोलन म्हणजे निव्वळ स्टंटबाजी....
अमोल अवचिते-
पुणे : चितेवर झोपुन आंदोलन करणे, ही केवळ स्टंटबाजी आहे. अपयश झाकण्यासाठी सतत विरोधात आहोत, असे सांगून नागरिकांची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न प्रभाग क्रमांक ४ चे राष्ट्रवादीचे चारही नगरसेवक करतात, असा आरोप शिवसेनेचे सह चिटणीस राजाभाऊ चौधरी यांनी केला आहे.
खराडी गावातील स्मशानभूमीचे काम अनेक दिवसांपासून रखडलेले आहे. याच निषेध करत नगरसेवक भैयासाहेब जाधव यांनी चितेवर झोपून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. यावर शिवसेनेने आक्षेप घेतला आहे. विरोधी पक्षातील नगरसेवक आहोत अस सातत्याने सांगितले जाते. मात्र यांना पालिकेचा किती निधी मिळतो हे जनतेला सांगत नाहीत. त्यांच्या कार्यकाळात किती मोठी कामे केली, हा संशोधनाचा विषय आहे. नगरसेवक शाळेचा, डॉक्टरचा गणवेश परिधान करून आंदोलने करत जनतेची दिशाभूल करण्याचे काम करतात. असा आरोप चौधरी यांनी केला आहे.
......
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आहे. त्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचा उपमुख्यमंत्री आहे, असे असताना देखील खराडीत सत्ताधारी पक्षातच धुसफूस असल्याचे चव्हाट्यावर आले आहे. शिवसेनेच्या एका नेत्याने राष्ट्रवादीच्या नगरसेवकावर टीका केल्याने सर्वच स्तरातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या दोन्ही पक्षातील स्थानिक नेत्यांना राज्यात सत्तेत असल्याचा विसर पडला की काय अशी चर्चा खराडीत रंगली आहे.
....
जर कोणाला ही स्टंटबाजी वाटत असेल, आणि त्यातून नागरिकांचा प्रश्न सुटणार असेल तर त्यात आम्ही समाधानी आहोत. स्मशानभूमीचे तरी राजकारण करू नये. आंदोलन केवळ जनतेच्या हितासाठीच केले जाते. नागरिक सूज्ञ आहेत. महापालिकेने एक महिन्यात बजेट देऊन जर काम पूर्ण केले नाही तर महापालिकेच्या आवारात तीव्र आंदोलन केले जाईल, अशी प्रतिक्रिया प्रभागातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी दिली आहे.