पुणे : महापालिकेच्या बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत एकाच दिवशी तब्बल ६५ कोटी रुपयांचा वर्गीकरणांच्या प्रस्तावांद्वारे अन्य कामांसाठी वळविण्यात आले. महापालिकेच्या २०१८-१९ मधील अंदाजपत्रकात सुचविण्यात आलेली तब्बल ३०० हून अधिक वेगवेगळ्या विकासकामांचा निधी इतर कामांसाठी वळविण्याचा विक्रमच केला आहे.
सभेत जुलै व आॅगस्ट महिन्याच्या कार्यपत्रिकेत तब्बल २७० हून अधिक वर्गीकरणाचे प्रस्ताव मंजूर केले. यामध्ये प्रामुख्याने नगरसेवकांनी अंदाजपत्रक तयार करताना सुचविलेल्या कामांसाठीच्या ‘स’ यादीमध्ये रस्ते, समाज मंदिर, पदपथ, विद्युत व्यवस्थेसह ड्रेनेज व अन्य देखभाल दुरुस्तीची कामासाठी निधी प्रस्तावित करण्यात येता. परंतु विविध विकासकामांचा निधी नगरसेवकांकडून वर्गीकरणांच्या प्रस्तावाद्वारे ज्यूट बॅग खरेदी करणे, प्रभागासाठी बाकडे खरेदी करणे, ड्रेनेज लाईन बदलणे, पेव्हिंग ब्लॉक बसविणे, विद्युत व्यवस्था करणे या कामांसाठी वळविण्यात आला आहे.
वर्गीकरणामध्ये ७ लाख रुपयांपासून ते दीड कोटींपर्यंतची ही वर्गीकरणे आहेत. धक्कादायक बाब म्हणजे ही वर्गीकरणे ज्या कामांसाठी मंजूर केली आहेत, त्या कामांसाठी प्रत्यक्षात या वर्गीकरणाद्वारे वळविलेल्या रकमेपेक्षा कितीतरी अधिकपट खर्च येणार आहे.अंदाजपत्रकाची अंमलबजावणी सुरू होऊन अवघे चार महिने झाले असतानाच; एवढ्या मोठ्या प्रमाणात अंदाजपत्रकाची मोडतोड झाली असून या वर्षीचे अंदाजपत्रक हे केवळ प्रशासनाने प्रस्तावित केलेल्या कामांचीच अंमलबजावणी करणारे ठरणार असल्याचे या वर्गीकरणांवरून दिसून येत आहे. महापालिकेचे अंदाजपत्रक एप्रिल २०१८ मध्ये सुरू झाल्यानंतरच तातडीने हे प्रस्ताव स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी आले होते. मात्र, स्थायी समितीकडून ते थांबविण्यात आले होते. अखेर हे २७० प्रस्ताव अवघ्या तासाभरात मंजूर करण्यात आले आहेत.