--
रांजणगाव गणपती : शिरूर तालुक्यातील कारेगाव रांजणगाव गणपती जिल्हा परिषद गटातील प्रमुख ग्रामीण मार्ग हे जिल्हा परिषदेकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्याची मागणी आंबेगाव शिरुर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर पाटील यांनी कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
या संदर्भात पाचुंदकर यांनी वळसे पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शिरूर तालुक्यातील आमदाबाद फाटा ते सोनेसांगवी मार्गे वाघाळे ते वरुडे रस्ता, गणेगाव - वरुडे मार्गे चिंचोली मोराची आणि कान्हूर मेसाई ते मांदळवाडी हे तीन प्रमुख रस्ते जिल्हा परिषदेकडून सार्वजनिक बांधकामं विभागाकडे वर्ग होणे अत्यंत महत्वाचे आहे. जेणेकरून या रस्त्याची कामे करण्यासाठी राज्य शासनाच्या निधीची उपलब्धता होऊन रस्त्याची मार्गी लागल्यास या रस्त्यावरून रांजणगाव एमआयडीसी येथे कंपनीत येणाऱ्या कामगारासाठी तसेच अष्टविनायक तीर्थक्षेत्र रांजणगाव गणपतीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सोयीचे ठरणार आहे. शिवाय बेल्हा ते जेजुरी आणि अष्टविनायक महामार्ग यांना पुणे नगर महामार्गावरून जोडण्यासाठी जवळचे होईल. त्यामुळे या कामी संबंधित विभागाला तातडीने आदेश देण्याची मागणी पाचुंदकर यांनी वळसे पाटील यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे. दरम्यान, यासंदर्भात कामगार मंत्री वळसे पाटील यांनी सार्वजनिक बांधकामं विभागाच्या अधिकार्यांना या रस्त्याचे प्रस्ताव तातडीने मंत्रालयात सादर करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे पाचुंदकर यांनी सांगितले.