पुणे : पुणे शहरातील पुरप्रवण क्षेत्रांबरोबरच शहरातील सर्व नाले तात्काळ साफसफाई करून मोकळे करावेत, असे आदेश महापौर मुरलीधर मोहोळ यांनी महापालिका प्रशासनाला दिले आहेत. पावसाळापूर्व कामांच्या पाहणी दरम्यान महापौर मोहोळ यांनी, कोथरूड-बावधन, वारजे कर्वेनगर, ढोले पाटील रोड, येरवडा-कळस-धानोरी, नगररोड-वडगावशेरी, वानवडी-रामटेकडी आणि हडपसर-मुंढवा या क्षेत्रिय कार्यालयांच्या अखत्यारितील परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, उपमहापौर सरस्वती शेंडगे यांच्यासह पालिकेतील अन्य पदाधिकारी, स्थानिक नगरसेवक व अधिकारी उपस्थित होते. यावेळी महापौर मोहोळ यांनी, पुणे शहरातील जे नाले सिमेंट पाईपद्वारे बंद केले आहेत ते सर्व नाले खुले करून प्रवाहीत करावेत असे सांगितले. तसेच कोथरूड स्मशानभूमी येथील पिण्याच्या पाण्याची लाईन शिफ्ट करून, कर्ल्व्हट व स्मशानभूमीची भिंत नव्याने बांधण्याबाबत सांगितले. संपूर्ण शहरातील विविध नाल्यावरुन जाणाऱ्या एमएसईबीच्या केबल्स सुरक्षित करण्याबाबत एमएसईबी प्रशासनाशी येत्या काही दिवसांत पत्रव्यवहार करून त्या तातडीने हटविण्यात याव्यात. शहरात ज्या ठिकाणी नाल्यांमध्ये कचरा साचतो व ज्या ठिकाणी पुराचे पाणी घुसते अशा ठिकाणी ड्रेनेज विभागाच्या सेवकांमार्फत रोजचे रोज जागा पाहणी करून, त्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही तात्काळ करावी. पॉवर हाऊस, रास्ता पेठ येथील नाल्यांची साफसफाई करणे. याचबरोबर पुणे शहर व घोरपडी, अनंत टॉकीज येथे कॅन्टोन्मेंट क्षेत्रातील मैलापाण्याबाबत ब्रिगेडीअर यांच्याशी पत्रव्यवहार करून, कॅन्टोन्मेंट क्षेत्रातील मैलापाणी प्रक्रिया न करता सोडल्यास त्यांच्याकडून शुल्क आकारून महानगरपालिकेने त्यावर प्रक्रिया करावी, अशी सूचनाही महापौरांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना केली.
पुरप्रवण क्षेत्रांबरोबरच शहरातील सर्व नाले साफसफाई करून मोकळे करा : महापौर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 12:41 PM
पुणे शहरातील जे नाले सिमेंट पाईपद्वारे बंद केले आहेत ते सर्व नाले खुले करून प्रवाहीत करावेत.
ठळक मुद्देमहापौरांकडून पावसाळापूर्व कामांच्या परिसराची पाहणी