मावळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्वच्छ भारत अभियाना’स २ आॅक्टोबर २०१४ रोजी धूमधडाक्यात सुरुवात झाली. नागरिकांना स्वच्छतेची सवय लागून आरोग्यदायी पर्यावरण व्हावे, हा यामागचा हेतू. पण, प्रसिद्धीसाठीच या अभियानाचा उपयोग शासकीय यंत्रणा, सामाजिक संस्था आणि पुढाऱ्यांनी केल्याचे वर्षभराचा आढावा घेतल्यानंतर स्पष्ट होत आहे. काही अपवाद वगळता परिस्थिती ‘जैसे थे’च आहे. मावळ तालुक्यातील ठिकठिकाणच्या स्थितीचा घेतलेला हा आढावा.ंतळेगाव दाभाडे- स्टेशन : ‘अस्वच्छता करणार नाही आणि करूही देणार नाही’, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेने भारतभर गतवर्षी २ आॅक्टोबरला सुरू झालेल्या ‘स्वच्छ भारत अभियाना’चा तळेगाव नगर परिषदेची अनभिज्ञता आणि नागरिकांचे असहकार्य यामुळे फज्जा उडाला आहे. उद्घाटनाच्या वेळी ‘नमनाला घडाभर तेल’ वापरत गाजावाजा करण्यात आलेली ही मोहीम नंतर कागदावरच राहिल्याने सगळीकडे अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले असून, रोगराईची भीती निर्माण झाली आहे.स्टेशन विभागातील स्वराजनगरीपासूून ते थेट माळवाडीपर्यंत चाकण रस्त्यावरील जागोजागी कचराकुंड्या ओसंडून वाहत आहेत. जलवाहिन्यांच्या व्हॉल्व्हची गळती होऊन पाणी वाहून काही ठिकाणी रस्त्याला गटाराची अवकळा आली आहे. जनरल हॉस्पिटल कंपाउंडच्या कडेला दुकानदार, हॉटेलवाले, फेरीवाले फेकत असलेला कचरा, मंडईजवळ कचरा, गाडीबाहेर ओसंडून वाहणारा कचरा, स्वामी समर्थ मंदिराच्या समोर जोशीवाडी रिंग रोडवर कुंडीपेक्षा बाजूला पडलेला कचरा, अंबिका पार्कजवळ प्रस्तावित रेल्वे फाटकाजवळ ड्रेनेजची ओतली जाणारी घाण या व अशा अनेक ठिकाणी नगर परिषदेचे दुर्लक्ष झाले आहे. कर्मचारी- अधिकारी कितीही दावा करत असले, तरी अभियानाबरोबरच सार्वजनिक स्वच्छतेचे तीन तेरा वाजल्याचे या बाबी स्पष्ट करीत आहेत. दैनंदिन स्वच्छतेकडे नगर परिषदेने जरी लक्ष दिले, तरी अभियानापेक्षाही त्याचा अधिक परिणाम होईल, असे बोलले जाते. मोजक्या स्वच्छतागृहांत पाय ठेवायलाही अंगावर काटा येतो. नगर परिषदेलाच दोष देऊन उपयोग नाही. नागरीकांचीही जबाबदारीआहे.
स्वच्छ भारत अभियान कागदावरच
By admin | Published: October 02, 2015 12:54 AM