पुणे : केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत स्पर्धेत पुणे महापालिकेचा देशात पहिला क्रमांक आला आहे. त्यासाठीचे पारितोषिक स्वीकारण्यासाठी महापौर प्रशांत जगताप, आयुक्त कुणाल कुमार यांच्यासह पालिकेतील सर्वपक्षीय पदाधिकारी गुरुवारी दिल्लीला रवाना होणार आहेत.केंद्र सरकारच्या या योजनेत पालिकेने शहरातील झोपडपट्टी परिसरात तब्बल २० हजार वैयक्तिक शौचालये बांधली आहेत. देशात इतकी शौचालये बांधणारी पुणे पालिका पहिलीच ठरली आहे. त्यानिमित्त पुरस्कार जाहीर झाला आहे. दिल्ली येथे शुक्रवारी (दि. ३०) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येईल.महापौर प्रशांत जगताप यांनी ही माहिती दिली. वैयक्तिक शौचालय बांधणीत पालिका राज्यात पहिली आली होती. प्रशासनाने बारकाईने नियोजन करून हे काम केले. त्यामुळे त्याची गती वाढली. पालिका प्रशासनाच्या कार्यक्षमतेचा हा सत्कार आहे, पुणेकरांनी दिलेल्या प्रतिसादामुळे हे शक्य झाले, असे महापौरांनी सांगितले. (प्रतिनिधी) पूरग्रस्तांसाठी दीड कोटीतमिळनाडूमधील पूरग्रस्तांसाठी पालिकेने सदस्यांच्या प्रभाग निधीमधून काही रक्कम वर्ग करून, १ कोटी ५७ लाख रुपये जमा केले आहेत. दिल्लीहून तमिळनाडू येथे जाऊन मुख्यमंत्री जयललिता यांच्याकडे या निधीचा धनादेश सुपूर्त करणार असल्याची माहिती महापौर जगताप यांनी दिली.
स्वच्छ भारत स्पर्धेत पुणे देशात अव्वल
By admin | Published: September 29, 2016 6:13 AM