पिंपरी : स्वच्छ शहरात महापालिका अव्वल ठरली, ही आनंदाची बाब आहे. या पुरस्काराने आपली जबाबदारी वाढली आहे. पुरस्काराला जागायला हवे. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी पालिका प्रशासन, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्थांचा सहभाग घेऊन पुढील वर्षी देशात पहिल्या पाचमध्ये कसे येऊ, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, अशी अपेक्षा सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.स्वच्छ शहराचा पुरस्कार मिळाल्याबद्दल शहरातील विविध संस्था, संघटना, समाजातील विविध घटकांनी पुरस्काराचे कौतुक केले आहे, तर काहींनी कडवट टीकाही केली आहे. देशात नववा आणि राज्यात पहिला पुरस्कार मिळाला असला, तरी वास्तवाचे भान महापालिका प्रशासनाने ठेवायला हवे. हा पुरस्कार मॅनेज असल्याची टीका काही सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. पुरस्कारावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप होत असले, तरी पुरस्काराने जागतिक पातळीवर शहराचा लौकिक वाढला आहे, असही मत व्यक्त केले. पुरस्काराचे सातत्य टिकवून ठेवायला हवे. शहर कायमस्वरूपी स्वच्छ कसे राहील, या दृष्टीने प्रयत्न करायला हवेत, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.(प्रतिनिधी)आपल्या शहराची मेट्रो सिटी स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू आहे. शहराचा विकास खरोखरच चांगला आहे. सर्वांत श्रीमंत महापालिका म्हणून आपल्या शहराचा लौकिक देशात आणि परदेशात आहे. ज्या प्रमाणात महापालिका स्वच्छतेवर खर्च करते, त्या तुलनेत स्वच्छता होते का? ही परिस्थिती बदलण्याची गरज आहे. स्वच्छतेबाबत आणखी प्रयत्नांची गरज आहे. महापालिकेने सामाजिक संस्थांचा सहभाग घेऊन विकासात योगदान द्यायला हवे. -विजय पाटील (अध्यक्ष, प्राधिकरण नागरी कृती समिती)
स्वच्छ पुरस्काराला लोकप्रतिनिधींनी जागायला हवे
By admin | Published: February 19, 2016 1:15 AM