पुणे : प्रबोधनाच्या माध्यमातून निर्मलवारीचे महत्व राज्यभर पोहोचले असून याच माध्यमातून राज्यात ‘स्वच्छता अभियान’ अधिक गतिमान करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी सोमवारी केले. ग्रामविकास विभाग, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने विधानभवन परिसरात आयोजित स्वच्छता दिंडी व ग्रामसभा दिंडीचा शुभारंभ बबनराव लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी लोणीकर बोलत होते. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते-पाटील, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, पाणी पुरवठा संचालक डॉ. सतीश उमरीकर, उपायुक्त (विकास) कांत गुडेकर यावेळी उपस्थित होते. स्वच्छता ही जनसेवा असून जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे,असे नमूद करून बबनराव लोणीकर म्हणाले, पंढरपूरच्या वारीत राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी सहभागी होतात. या वारक-यांना शासनाच्या वतीने सर्व सुविधा पुरविल्या जातात. पंढरपूरच्या वारीत शेतकरी, कष्टकरी जनता सहभागी होत असते. पंढरपूर स्वच्छ राहण्याच्या दृष्टीने शासनाच्या माध्यमातून पंढरपूरमध्ये २५ हजार शौचालये उभारण्यात आली असून गेल्या काही वर्षात प्रबोधनामुळे पंढरपूरची वारी निर्मल झाली आहे. विश्वास देवकाते-पाटील म्हणाले, पंढरपूरच्या वारीच्या कालावधीत पालखी मार्गावर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून वारक-यांना सर्व सुविधा पुरविल्या जात आहेत. पालखी मार्गावर मोठ्या वाहनांना जाता येत नाही. त्यामुळे दूचाकी वरून आरोग्य सेवा पुरवली जात आहे.डॉ. दीपक म्हैसेकर म्हणाले, स्वच्छता दिंडीत राज्यभरातील १७ जिल्ह्यांचे चित्ररथ सहभागी झाले आहेत. चंद्रभागेच्या स्वच्छतेसाठी शासनाच्या वतीने ‘नमामि’ चंद्रभागा अभियान सुरू करण्यात आले असून हे अभियान चार टप्प्यात राबविण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला राज्यभरातून आलेल्या निवडक कलापथकांचे सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते स्वच्छता दिंडी व ग्रामसभा दिंडीत सहभागी झालेल्या चित्ररथांना हिरवा झेंडा दाखविण्यात आला.........निर्मलवारीमध्ये २५० हून अधिक कलाकार सहभागी वारकऱ्यांना व ग्रामस्थांना मार्गदर्शन व प्रबोधन करण्यासाठी पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, उस्मानाबाद,जालना, लातूर, ठाणे,अहमदनगर ,बीड, नांदेड,परभणी, हिंगोली, वाशिम, यवतमाळ व औरंगाबाद या जिल्ह्यातून जिल्हा परिषदेच्या उत्तम दर्जाचे कलापथक या स्वच्छता दिंडीमध्ये सहभागी झाले आहेत. तसेच विविध स्वच्छता संदेशांनी रंगविलेले चित्ररथ वारीमध्ये सहभागी होणार आहेत.निर्मलवारीमध्ये २५० हून अधिक कलाकार सहभागी होणार आहेत.पालखी सोहळ्यानिमित्त अधिकाधिक वारकऱ्यांपर्यंत स्वच्छतेचा संदेश पोहचविला जाणार आहे.
राज्यात ‘स्वच्छता अभियान’ गतिमान करणार : बबनराव लोणीकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2018 9:42 PM
शासनाच्या माध्यमातून पंढरपूरमध्ये २५ हजार शौचालये उभारण्यात आली असून गेल्या काही वर्षात प्रबोधनामुळे पंढरपूरची वारी निर्मल झाली आहे.
ठळक मुद्देस्वच्छता व ग्रामसभा दिंडीचा शुभारंभनिर्मलवारीमध्ये २५० हून अधिक कलाकार सहभागी