जेजुरी : जेजुरी नगरपरिषद आणि खासगी संगणक प्रशिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने जेजुरी स्वच्छ सर्व्हेक्षण अंतर्गत एक दिवसाचे स्वच्छता शिबिर घेण्यात आले. यावेळी १४२ तरुण तरुणी व पालक वर्ग उपस्थित होते. जेजुरी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी संजय केदार यांच्या मार्गदर्शनाखाली जेजुरी स्वच्छ सर्व्हेक्षण २०१९ अंतर्गत गुरुवार (दि. १५) रोजी जेजुरी पालिका सभागृहात एक दिवसाचे शिबिर घेण्यात आले होते. यावेळी नोडल अधिकारी बाळसाहेब बगाडे, आरोग्य विभागाचे प्रमुख राजेंद्र गाढवे, आरोग्य पर्यवेक्षक प्रसाद जगताप यांनी शिबिरार्थींना ओला सुका कचरा वर्गीकरण, तसेच प्लॅस्टिक व थर्माकोलचे दुष्परिणाम आणि प्लॅस्टिकबंदी याबाबत मार्गदर्शन केले.स्वच्छता अॅप कसे डाउनलोड करायचे, त्यावर माहिती अशी भरायची याबाबत नागरिकांना प्रात्याक्षिके देवून मार्गदर्शन केले.यावेळी नगरसेवक गणेश शिंदे उपस्थित होते.
नगरपालिका इमारत, पाणी पुरवठा केंद्र, अग्निशमन केंद्र याठिकाणी या शिबिरार्थींनी स्वच्छता मोहीम राबविली. शहर समन्वयक दीपक शिंदे, तसेच स्वच्छ सर्व्हेक्षण टीमच्या हीना इनामदार, नितीन वाल्मीकी यांनी या स्वच्छता अभियानचे नियोजन केले. जेजुरी शहरातील सर्व नागरिकांनी जेजुरी स्वच्छ अभियानास सहकार्य करावे असे आवाहन जेजुरी पालिकेच्या वतीने करण्यात आले.