पुणे : ‘मै अकेला ही चला था जानिब-ए-मंजिल मगर, लोग साथ आते गये और कारवां बनता गया !’ या मजरूह सुलतानपुरी यांच्या ओळींचा प्रत्यक्ष अनुभव ‘दिव्यांग’ तरुणांनी रविवारी सकाळी घेतला. निमित्त होते स्वच्छता अभियानाचे. या तरुणांनी शिवाजीनगर बस स्टॅँड स्वच्छ करण्याचे ठरवले आणि त्याची सुरुवातही केली. कुबड्या घेतलेले हे तरुण कचरा जमा करीत असल्याचे पाहून तेथील नागरिकांनीही त्यांना मदत करत स्वच्छता अभियानात सहभाग घेतला. स्वच्छतेविषयीचा एक व्हिडीओ अमोल शिनगारे आणि महेश मिस्त्री या दिव्यांग तरुणांनी व्हॉट्सअॅपवर पाहिला. रविवार असल्याने त्यांनीदेखील हा वेळ चांगल्या कामासाठी खर्च करण्याचे ठरविले. त्यांना त्यांचे मित्र बालाजी मोरे, रामा चलवादी, आणि सागर भारत यांनीही सहकार्य केले. त्यातून आज सकाळी आठ वाजता हे दिव्यांग तरुण शिवाजीनगर येथील बस स्टॅँडवर गेले. त्यांनी बस स्टॅँड आणि बॅँक आॅफ महाराष्ट्रासमोरील पीएमपीचा बस स्टॉप स्वच्छ केला. त्यांचे हे काम पाहून तेथील नागरिकही त्यांच्यासोबत स्वच्छता करण्यात सहभागी झाले. तसेच या तरुणांसोबत ‘दिव्यांग्ज युथ विल पॉवर’ या ग्रुपचे सर्व दिव्यांग सभासदही सहभागी झाले. शारीरिक क्षमतेपेक्षा अधिक काहीतरी वेगळे करण्याची या तरुणांची इच्छा होती. त्यातून त्यांनी हा उपक्रम राबविला. समाजात या दिव्यांगांकडे सहानुभूतीने पाहिले जाते. परंतु, या दिव्यांगांना सहानुभूती नको असते. त्यांच्यातही वेगळे काहीतरी करण्याची धमक आणि ऊर्जा असते. हेच त्यांनी या उपक्रमातून दाखवून दिले. सर्व कचरा जमा केल्यानंतर त्यांनी तो तिथेच एका ठिकाणी जमा न करता थेट घोले रोड येथील कचरा डेपोमध्ये नेऊन टाकला.
दिव्यांग तरुणांचा स्वच्छतेचा ध्यास; पुण्यातील शिवाजीनगर परिसर केला चकाचक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 12:30 PM
दिव्यांग’ तरुणांनी शिवाजीनगर बस स्टॅँड स्वच्छ करण्याचे ठरवले आणि त्याची सुरुवातही केली. कुबड्या घेतलेले हे तरुण कचरा जमा करीत असल्याचे पाहून तेथील नागरिकांनीही त्यांना मदत करत स्वच्छता अभियानात सहभाग घेतला.
ठळक मुद्देकुबड्या घेतलेले हे तरुण कचरा जमा करीत असल्याचे पाहून नागरिकांनीही घेतला सहभाग या तरुणांसोबत ‘दिव्यांग्ज युथ विल पॉवर’ या ग्रुपचे सर्व दिव्यांग सभासदही सहभागी