इंदापूर : सुविधांचा अभाव, नादुरुस्त मैदान, तसेच मोठ्या प्रमाणात निधी मिळूनही इंदापूर क्रीडा संकुलाच्या विकासाकडे दुर्लक्ष झाले होते. यामुळे खेळाडूंना सरावासाठी हक्काचे मैदान नसल्याने त्यांना रस्त्यावर सराव करण्याची वेळ आली होती. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने देताच क्रीडा विभागाला जाग आली. स्वत: जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान व शासकीय कुस्ती प्रशिक्षक शिवाजी कोळी यांनी शुक्रवारी सकाळी ६ वाजता इंदापूर क्रीडा संकुलाच्या मैदानात येत १०० खेळाडूंना सोबत घेऊन, स्वत: हातात झाडू घेवून क्रीडा संकुलाची स्वच्छता केली.
इंदापुर येथे कोट्यवधी रूपये खर्च करून क्रीडा संकुल उभारण्यात आले. ग्रामीण भागातील खेळाडूंना गावातच सुविधा मिळावा हा या मागचा हेतू होता. मात्र, निधी मिळूनही या संकलाची देखभाल दुरूस्ती अभावी तसेच प्रशासानच्या उदासीन धोरणामुळे दुरवस्था झाली होती. यामुळे मैदान असूनही खेळाडूंना त्यांचा लाभ मिळत नव्हता. यामुळे त्यांना पुण्यात येऊन सराव करण्याची वेळ येत होती. येथील क्रीडा अधिकारी या ठिकाणी अनुपस्थित राहत असल्याने खेळाडू तसेच क्रीडा शिक्षकांना पुण्यात त्यांच्या सहिसाठी यावे लागत होते. यामुळे त्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती. याचे वृत्त लोकमतने देऊन दिले. अखेर क्रीडा विभागाला जाग आली. जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान व शासकीय कुस्ती प्रशिक्षक शिवाजी कोळी यांनी शुक्रवारी १०० खेळाडूंना सोबत घेऊन स्वच्छतेला सुरूवात केली. यावेळी ही वार्ता क्रीडा संकुल जवळ हाकेच्या अंतरावर असलेल्या मारकड कुस्ती केंद्रात समजताच तेथील प्रशिक्षक मारुती मारकड सर यांना कळाली. त्यांनीही त्यांच्या केंद्रातील २० मल्लांना सोबत घेवून तालुका क्रीडा संकुलावर हजेरी लावली. तर शेळगावचे ७५ विद्यार्थी खेळाडूही सकाळी सकाळी मैदानावर हजर झाले, त्यांच्यासोबत क्रीडा शिक्षक कैलास जाधव यांनीही तीन तास स्वच्छता केली.
संकुलात कोणीतरी स्वच्छता करतंय हे पाहताच स्थानिक नागरिक शरद कोळेकर, दत्तात्रय जाधव, अशोक करे, सागर नरळे यांनीही त्यामध्ये सहभाग घेवून स्वच्छतेला सुरुवात केली. मात्र जिल्हा क्रीडा अधिकारी मैदानावर येवून दोन तास झाले, तरी तालुका निवासी क्रीडा अधिकारी सुहास व्हनमाने यांचा पत्ता नव्हता. त्यामुळे विजय संतान यांनी क्रीडा अधिकारी यांना फोन करून विचारले असता. त्यांनी इंदापूरमध्ये असल्याचे सांगितले. मात्र त्यावेळी ते पुण्यावरून इंदापूरला येत असल्याचे समजले. सर्वांनी मिळून इंदापूर तालुका क्रीडा संकुलावरील, कार्यालयातील सर्व स्वच्छता करून, आजूबाजूच्या परिसरातील संपूर्ण प्लॅस्टिक कचरा उचलून, कार्यालयातील तुंबलेले शौचालय साफ करून घेतले. कार्यालयातील राडा रोडा उचलून, कार्यालयातील सर्व क्रीडा साहित्य व्यवस्थित करून ठेवले व गेल्या कित्येक वर्षांपासून कार्यालयाचे गंजलेले कुलूपही संतान यांनी बदलले. क्रीडा मैदान बांधण्याचा ठेका घेतलेले, ठेकेदार लक्ष्मण देवकाते यांना समक्ष बोलावून विजय संतान यांनी चांगलाच खरपूस समाचार घेतला. स्वच्छतागृह आणि चेंजिंग रूमचे ठेकेदार अतुल म्हेत्रे यांना काम पूर्ण करण्याचे आदेश दिले.इंदापूर क्रीडा संकुलावर मुला-मुलींचे २ चेंजिंग रूम आणि स्वच्छतागृहाचे काम चालू आहे. मात्र, ठेकेदाराने ते काम अर्धवट सोडले आहे. मैदान बांधण्याचे काम ज्या ठेकेदाराला दिले आहे, त्याची मुदत संपूनही त्याने काम केले नाही. दोन्ही ठेकेदारांनाकामाचे पैसे अदा करूनही त्यांनी काम का केले नाही? याची चौकशी करण्यात येणार असून, ज्याने विहित कालावधीत काम केले नाही, त्यांना शासकीय नियमनुसार दंड करण्यात येणार आहे.-विजय संतान,जिल्हा क्रीडा अधिकारी, पुणेनिवासी क्रीडा अधिकारी यांनी इंदापूरचा रहिवाशी पुरावा कार्यालयाला जमा करावा.इंदापूर तालुका निवासी क्रीडा अधिकारी सुहास व्हनमाने यांचे इंदापूरला निवासी अधिकारी पद असताना ते इंदापूरमध्ये उपलब्ध नसतात. त्यामुळे त्यांनी पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाला इंदापूरचा रहिवाशी असल्याचा, भाडेकरार अथवा रहिवाशी दाखल सादर करावा असा आदेश दिला असून, अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. असे विजय संतान यांनी सांगितले.कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेला वाली कोण?इंदापूर तालुका क्रीडा संकुल कोट्यवधी रुपये खर्चून बांधण्यात आले. मात्र, त्याची देखभाल करण्यासाठी, ना स्वच्छता कर्मचारी, ना रखवालदार, ना क्रीडा शिक्षक, एकही व्यक्ती येथे उपलब्ध नाही. पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने येथे एकही कर्मचारी येथे नियुक्त न केल्याने या कोट्यवधी रुपयांचा मालमत्तेला वाली कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.