पुणे : महापालिकेच्या शाळांमधील तब्बल ८० हजार विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे प्रशिक्षण देण्यात साह्य करण्यासाठी पालिकेच्या वतीने आरबी या आंतरराष्ट्रीय कंपनीशी शुक्रवारी सांमजस्य करार करण्यात आला. वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता कशी ठेवायची व त्यातून स्वच्छ व स्वस्थ आरोग्य कसे मिळवायचे, याबाबत ही कंपनी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकासह माहिती देणार आहे.‘बनेगा स्वच्छ इंडिया’ अंतर्गत पालिकेने हा करार केला असल्याची माहिती आयुक्त कुणाल कुमार यांनी दिली. आरबी ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील कंपनी आहे. जगातील ४० देशांमध्ये त्यांचे विविध क्षेत्रांत सामाजिक काम सुरू आहे. त्यांना स्वच्छतेसंदर्भात विविध देशांमध्ये काम करण्याची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी पुणे शहराला प्राधान्य दिले. आता पुढील ५ वर्षांसाठी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे प्रशिक्षण देण्यासाठी ही कंपनी पालिका शिक्षण मंडळाला सहकार्य करेल. स्मार्ट सिटीमध्ये सार्वजनिक आरोग्याला महत्त्व दिले गेले असून, त्यासाठीच पालिकेने कंपनीबरोबर हा सामंजस्य करार केला असल्याचे कुणाल कुमार यांनी सांगितले. त्याचबरोबर पुणे शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहे कशी असावीत, त्यासाठी काय करावे लागेल, त्याचा खर्च किती, याबाबत पालिकेच्या अधिकाऱ्यांना ही कंपनी विशेष प्रशिक्षण देणार आहे. या वेळी शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष वासंती काकडे, पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख सुरेश जगताप, कंपनीचे वरिष्ठ अधिकारी सुरेश जगताप आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)सहा महिन्यांनी आढावादर सहा महिन्यांनी त्यांच्याकडून पुणे शहराच्या सार्वजनिक आरोग्याचा निर्देशांक जाहीर करण्यात येईल. त्यातून कशामध्ये कोणती सुधारणा करायची आहे, याचा अंदाज पालिकेला येईल. त्यासाठीही कंपनी सहकार्य करणार आहे, असे कुणाल कुमार म्हणाले.
पालिका शाळांत स्वच्छतेचे धडे
By admin | Published: July 24, 2016 5:48 AM