लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : स्वारगेट ते काजत्र भुयारी मेट्रो प्रकल्पाच्या वाढीव खर्चाला बुधवारी (दि. २२) रोजी महापालिकेच्या मुख्य सभेने अखेर मंजुरी दिली. यामुळे स्वारगेट ते कात्रजच्या मेट्रोचा मार्ग मोकळा झाला आहे.
सध्या शहरात काम सुरू असलेल्या पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मेट्रो प्रकल्पाचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे. यासाठी स्वारगेट ते कात्रज या मार्गावर भुयारी मेट्रो प्रस्तावित करण्यात आली आहे. या प्रकल्पाला निधी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव मुख्य सभेसमोर ठेवण्यात आला होता. मात्र, प्रकल्पाची माहिती देण्यासाठी महामेट्रोचा अधिकारी जोवर मुख्यसभेस येत नाही, तोपर्यंत मेट्रोचा कोणताच प्रस्ताव मंजूर करू नये, असा पवित्रा नगरसेवकांनी घेतला होता. त्यामुळे हा प्रस्ताव वारंवार पुढे ढकलण्यात येत होता.
महामेट्रोचे संचालक अतुल गाडगीळ यांनी बुधवारी मुख्य सभेस उपस्थिती लावून प्रकल्पाची माहिती दिली. त्यानंतर सर्वपक्षीय नगरसेवकांनी एकमताने या मेट्रो मार्गाच्या वाढीव खर्चाला मान्यता दिली.
चौकट
स्टेशनची संख्या वाढवा
महामेट्रोने प्रस्तावित केलेल्या ‘स्वारगेट ते कात्रज’ या भुयारी मेट्रो मार्गावर मार्केट यार्ड, पद्मावती व कात्रज अशी तीन स्थानके प्रस्तावित आहेत. या मार्गावरील धनकवडी व बालाजीनगर हे परिसर दाट लोकवस्तीचे आहेत. या परिसरात मेट्रो स्टेशन प्रस्तावित नसल्याने येथील नागरिकांना मेट्रोचा वापर करता येणार नाही. कोणीही पद्मावती येथे किंवा कात्रज येथे चालत जावून मेट्रोचा वापर करणार नाही. त्यामुळे बालाजीनगर व धनकवडीच्या नागरिकांसाठी बालाजीनगर येथे स्टेशन करावे, अशी मागणी यावेळी अनेक नगरसेवकांनी केली.
-------------------------------------
असा असेल स्वारगेट- कात्रज भुयारी मेट्रो मार्ग
मार्गाची लांबी - ५.४३ किलोमीटर
प्रकल्प खर्च - ४ हजार २० कोटी खर्च
कामाची मुदत - जुलै २०२७