पुणे: राज्यातील जिल्हा परिषदांमधील सरळसेवा भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. गड ड व वाहनचालक सोडून गट क संवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबत ग्रामीण विकास विभागाने सुधारित कालबद्ध कार्यक्रम जाहीर केला आहे. कर्मचाऱ्यांच्या या भरतीमध्ये सरळ सेवेच्या कोट्यातील रिक्त पदांच्या ८० टक्के मर्यादित रिक्त पदे भरण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
दरम्यान, १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत ही भरती करणे बंधनकारक असून भरतीचा ३१ मेपर्यंतचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर केला आहे. ही भरती जिल्हा परिषदांनी त्यांच्या स्तरावर जिल्हा निवड मंडळामार्फत करण्यासही सांगण्यात आले आहे.
या भरतीसाठी संभाव्य वेळापत्रकही तयार करण्यात आले असून जिल्हा परिषद यांनी ३१ जानेवारी अखेर बिंदू नामावली अंतिम करणे, संवर्गामधील आरक्षण निश्चित करणे, तसेच कंपनीची निवड ही कामे येत्या अडीच महिन्यात पूर्ण करायचे आहेत. त्यानंतर १ ते ७ फेब्रुवारीपर्यंत पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध केली जाईल. ८ ते २२ फेब्रुवारीपर्यंत उमेदवारांचे अर्ज मागवून १ मार्चपर्यंत अर्जांची छाननी करून ५ मार्चपर्यंत पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येईल. प्रत्यक्ष परीक्षेच्या आयोजनासंदर्भात जिल्हा परिषद व जिल्हा निवड समितीने ५ एप्रिलपर्यंत कार्यवाही करायची असून प्रत्यक्ष परीक्षा १४ ते ३० एप्रिलपर्यंत घ्यावी लागणार आहे. तर ३१ मेपर्यंत निकाल जाहीर करून पात्र उमेदवारांना नियुक्ती आदेश द्यावे लागणार आहेत.