वेल्हे (पुणे) : सावकारी लायसन्स मिळवून देण्याच्या नावाखाली ५० हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी सहायक निबंध कार्यालय वेल्हे येथील लिपिक पंढरीनाथ तमनर यास अटक करण्यात आली.
विलास जगन्नाथ पांगारे (रा. वेल्हे ) यांनी पंढरीनाथ तमनर यांना प्रत्यक्ष भेटून सावकारी लायसन्स मिळावे यासाठी मागणी केली. मात्र, यासाठी लागणारा प्रस्ताव तयार करावा लागतो, जिल्हा निबंधक पुणे कार्यालयात पाठपुरावा करून तुम्हास लायसन्स देण्यासाठी प्रयत्न करावे लागतील म्हणून पैशाची मागणी केली. त्यामध्ये पुणे येथील कार्यालयास ३० हजार व स्वतःसाठी २० हजार अशा एकूण ५० हजार रुपयांची मागणी केली होती.
त्यानुसार पांगारे यांनी लाचलुचपत विभाग पुणे यांच्याशी संपर्क साधून तमनर यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. उपलब्ध पुरावे व माहितीच्या आधारे तमनर याला आज अटक करण्यात आली. दि. २८ मे रोजी पोलिस निरीक्षक संदीप वऱ्हाडी यांनी याबाबत सापळा रचून पुरावे गोळा केले होते.