पुणे : परमिटरूमसाठी पोलीस व वाहतूक शाखेचे ना हरकत प्रमाणपत्र मिळविण्यासाठी पाठविण्याच्या पत्रासाठी ५ हजार रुपयांची खासगी व्यक्तीकडून लाच घेताना, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपिकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले.
लिपिक उत्तम किसन धिंदळे (वय ४५), विठ्ठल चव्हाण अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तक्रारदार यांनी परमिटरूम लायसन्स प्रक्रियेसाठी राज्य उत्पादन शुल्क कार्यालयातून पोलीस आयुक्त कार्यालय व वाहतूक शाखेचे ना हरकत प्रमाण मिळावे लागते. त्यासाठी या कार्यालयांना पाठविण्याचे पत्र देण्यासाठी तक्रारदार हे उत्तम धिंदळे याला भेटले असता, त्याने ५ हजार रुपयांची लाच मागितली.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे आलेल्या तक्रारीची ११ एप्रिल रोजी पडताळणी केली असता, पोलीस आयुक्तालय व वाहतूक शाखेकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळण्याबाबत त्या कार्यालयांना पाठविण्याचे पत्र देण्यासाठी ५ हजारांची लाच मागत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात सापळा लावण्यात आला. त्यात खासगी व्यक्ती विठ्ठल चव्हाण याच्यामार्फत ५ हजार रुपये स्वीकारल्यानंतर धिंदळे याला ताब्यात घेतले आहे. बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपअधीक्षक विजयमाला पवार तपास करीत आहेत.