पुणे : गावातील शेतजमिनीची मोजणी करण्यासाठी सुरुवातीला १० हजार रुपयांची लाचेची मागणी करून तडजोडी अंती ४ हजार रुपयांची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सासवड येथील भूमी अभिलेख कार्यालयातील नगर भूमापन लिपिकाला अटक केली.
प्रमोद गणेश तुपे (वय ३०) असे अटक केलेल्या लिपिकाचे नाव आहे.
तक्रारदार यांची गावातील मालकीचे शेत जमिनीची मोजणी करण्यासाठी तुपे याने प्रथम १० हजार रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर तक्रारदाराच्या तक्रारीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २१ जानेवारी रोजी त्याची पडताळणी केली. त्यावेळी त्यांनी तडजोड करीत ४ हजार रुपये घेण्याचे मान्य केले. प्रत्यक्षात सापळा कारवाई होऊ शकली नाही. मात्र, त्यांनी लाचेची मागणी केली असल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन तुपे याला अटक केली. न्यायालयाने २६ मार्चपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे. सहायक पोलीस आयुक्त वर्षाराणी पाटील अधिक तपास करीत आहेत.