पुणे : आधारकार्ड पॅनकार्डला लिंक करण्याच्या बहाण्याने लिंक पाठवीत दीड लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समाेर आला आहे. हा प्रकार २६ ऑगस्ट २०२२ रोजी घडला. याबाबत प्रियांशू प्रदीप नेमा (वय २१, रा. कात्रज) यांनी फिर्याद दिली आहे.
अधिक माहितीनुसार, प्रियांशू याला अनोळखी नंबरवरून मेसेज आला. तुमचे आधारकार्ड पॅनकार्डला लिंक नाही. ते लवकरात लवकर करावे लागेल, असे त्यात म्हटले होते. मेसेजमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक केले असता टेलिग्राम ॲप्लिकेशन उघडले. त्याद्वारे माहिती भरल्यावर प्रियांशूच्या बँक खात्यातून १ लाख ५७ हजार रुपये डेबिट झाल्याचा मेसेज आला. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस निरीक्षक पुराणिक पुढील तपास करीत आहेत.