पौड : पौड ( ता.मुळशी ) येथे लोंबकळलेल्या तारांचा धक्का लागून मुलाचा बळी गेल्याची घटना घडली आहे. पौड गावात अनेक ठिकाणी लोंबकळलेल्या तारांचा धोका निर्माण झाला आहे. महावितरणच्या अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना सांगूनही या तारा ओढल्या जात नसल्याने सर्वञ संताप व्यक्त केला जात आहे. घडलेल्या घटनेनुसार, श्रेयश ऊर्फ साई चेतन राऊत ( १३ वर्ष ) हा दिंगबरनाथ आळी पौड कोळवण रस्त्याच्या कडेला क्रिकेट खेळत असताना चेंडू पञ्यावर गेला म्हणून चेंडू काढायला पञ्यावर चढला. माञ पत्र्याजवळच असलेला महावितरणच्या तारेचा झटका श्रेयशला बसला. यात श्रेयश पञ्यावरून खाली फेकला गेला. यामध्ये श्रेयश हा काही ठिकाणी भाजला गेला होता. तर त्याच्या हातालाही मोठी दुखापत झाली होती. पुण्यातील खाजगी दवाखान्यात त्याच्यावर उपचार सुरू होते.माञ श्रेयशचा जीव वाचविण्यात यश आले नाही. श्रेयशच्या मनमिळावू स्वभावामुळे त्याच्या अत्यंविधीला नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. पौड गावात लोंबत असलेल्या तारांचा प्रश्न ऐरणीवर आलेला असून महावितरणला अनेक वेळा विनंती करूनही या तारा वर ओढल्या जात नसून अजून किती बळी जाण्याची वाट महावितरणचे अधिकारी व कर्मचारी पाहत असल्याचा प्रश्न पौड ग्रामस्थांना पडला आहे.
चेंडू काढायला पत्र्यावर चढला; विजेचा धक्का बसून मुलाचा दुर्दैवी मृत्यू, पौडमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2023 3:39 PM