पुणे : कर्जत जवळच्या ढाक बहिरी किल्ल्यावर ५ फेब्रुवारी रोजी औरंगाबाद येथील पाच जण ट्रेकिंगसाठी गेले होते. दुपारी त्यापैकी एकाचा तोल गेल्यामुळे पडून जागीच मृत्यू झाला. मागून येत असलेल्या दोन ट्रेकर्सला मृतदेह अत्यंत अडचणीच्या ठिकाणी दिसला. त्यांनी व्हिडिओ काढून मदतीसाठी सर्वत्र पाठवला. मृत व्यक्ती ढाक डोंगराच्या अत्यंत अवघड अशा अरुंद बाजूच्या उतारावर पडल्यामुळे तसेच काळोख आणि घनदाट जंगलामुळे रेसक्यू करणे अवघड होते. सायंकाळी ६ च्या सुमारास सुरू झालेल्या रेसक्यु ऑपरेशनला, मृतदेह सांडशी गावात आणण्यासाठी तब्बल १० तास लागले.
रेस्क्यू कोऑर्डिनेशन कमिटीचे मुख्य समन्वयक पद्माकर गायकवाड व इतर सदस्य ओंकार ओक, अमित गुरव यांनी समन्वय साधून मृतदेह पहाटे कर्जत येथे पोहचवला. जुन्नर येथील जितेंद्र हांडे-देशमुख यांच्याकडून महाराष्ट्र माऊंटेनिअर्स रेस्क्यु कोऑर्डीनेशन सेंटरला ही बातमी कळताच हेल्पलाईन मार्फत कर्जत येथून संतोष दगडे व त्यांचे सहकारी यांनी सांडशी गावातील स्थानिकांसह घटनास्थळी धाव घेतली. त्यामागोमाग लगेचच यशवंती हायकर्सचे (खोपोली) सदस्य हेही आवश्यक साहित्य घेऊन घटनस्थळी पोहोचले.
कर्जतचे संतोष दगडे, अभि दगडे, कैलास व सौरभ. सांडशीतील स्थानिक ऋषिकेश कदम, किरण शिर्के, संकेत कदम, संदेश शिर्के, मंगेश तुरडे, रोशन पेडणेकर, हरी ठोंबरे, लखन जाधव, गणेश मुकणे व गणेश सोमनाथ आणि यशवंती हायकर्सचे (खोपोली) सदस्य महेंद्र भंडारे, अरविंद पाटील, अभिजित घरात, सौरभ रावल, भावेश शिर्के, राजू मोरे, रुपेश जाधव, प्रणित गावंड, संदीप पाटील यांनी या रेस्क्यू मोहिमेत महत्वपूर्ण कामगिरी बजावली. डोंगराळ व दुर्गम भागात किंवा साहसी पर्यटनादरम्यान अपघात झाल्यास मदतीसाठी ७६२०२३०२३१ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करू शकतात.