जुन्नर: आदिवासी भागातील घाटघर जवळील जिवधन किल्याजवळ असणा-या वानरलिंगी सुळक्यावर चढाई करत असतांना एक गिर्यारोहक जवळपास २०० फुट खोल दरीत कोसळला. नशीब बलवत्तर असल्यामुळे तसेच दाट झाडीमध्ये लटकल्यामुळे या गिर्यारोहकाचा जीव वाचला. वनविभागाचे कर्मचारी तसेच जुन्नर येथील स्थानिक गिर्यारोहकांच्या ४ तासांच्या अथक प्रयत्नानंतर या गिर्यारोहकाला सुरक्षित वाचवण्यात आले. ही घटना शनिवारी सकाळी घडली असून शरण सावंत असे या जखमी गिर्यारोहकाचे नाव आहे. जुन्नर तालुक्याच्या नाणेघाट परिसराच्या आदिवासी भागातील घाटघर जवळील जिवधन किल्याजवळ असणा-या वानरलिंगी सुळक्यावर चढाई करण्यासाठी अनेक गिर्यारोह येत असतात. शनिवारी सकाळी वानरलिंगी सुळक्यावर गिर्यारोहणासाठी भोर येथून आलेल्या प्रणय सावंत (वय १७) आणि शरण सावंत (वय २२) या दोन गिर्यारोहकांपैकी एक गिर्यारोहक शरण सावंत हा शनिवारी सकाळी साडे नऊच्या सुमारास सुळक्यावर चढाई करत असताना २०० फूट खोल दरीत कोसळला. नशीबाने साथ होती म्हणून २०० फूट खोल दरीत कोसळूनही केवळ झाडाला अडकल्याने त्याचा जीव वाचला. वानरलिंगी सुळका चढण्यास सुरुवात केल्यानंतर पंधरा फूट उंचीवर गेल्यावर शरण सावंत याच्या हाताला वेदना होऊ लागल्यामुळे त्यांच्या हाताची पडक सैल झाली. यामुळे त्याचा हात निसटल्याने वानरलिंगी सुळक्याच्या पश्चिमेला बाजूला दोनशे फूट खोल दरीत कोसळला. त्यावेळी त्याचा भाऊ प्रणय सावंत याने मदतीसाठी आरडाओरडा केला. जवळच्या हॉटेलचे चालक सुभाष आढारी यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यांनी याबाबत तातडीने जुन्नर पोलीसांना माहिती दिली. पोलिसांनी गिर्यारोहक असलेले वनरक्षक मेजर रमेश खरमाळे यांना मदतिसाठी बोलवले. पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ दिवटे, वनरक्षक रमेश खरमाळे , घाटघर येथील सुभाष आढारी, नितीन शिंदे, हनुमंत भाल, सॅम पाडळे, एलेक्स मेंन्डोंसा, विलास रावते, विष्णू शिंदे, रोहीदास आढारी विनायक गोसावी, अक्षता मांढरे, तेजस पोटे, गौरव कांबळे याबचाव पथकाने चार तासाच्या प्रयत्ननांतर या गियारोहकाला वाचविले. या गिर्यारोहकाला पुढील उपचारासाठी पुणे येथे हलविण्यात आले आहे.
जुन्नरच्या वानरलिंगी सुळक्यावर चढाई करताना २०० फुट खोल दरीत पडला गिर्यारोहक, दाट झाडांनी दिले जीवदान
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2017 7:43 PM