पिंपरी : आजमितीला सगळा ऑनलाईन व्यवहाराचा जमाना आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. सोबत रोख रक्कम वागवायला नको म्हणून लोकं अधिक अधिक ऑनलाईनच्या व्यवहाराला पसंती देतात. पण जसे ऑनलाईन पेमेन्टचे फायदे तसेच तोटे देखील आहे. याचाच प्रत्यय भोसरी येथील लांडेवाडी चाैकातील हॉटेलमध्ये जेवणासाठी गेलेल्या चार मित्रांना आला. त्यांना हॉटेलचे जेवण चांगलेच महागात पडले. त्यांच्या खात्यातून परस्पर तब्बल ९५ हजार रुपये काढण्यात आले आहे.
हॉटेलमध्ये आलेल्या ग्राहकांच्या डेबिट कार्डचे क्लोनिंग केले. त्यानंतर त्यांच्या खात्यातून परस्पर ९४ हजार ५०० रुपये काढून आर्थिक फसवणूक केली. भोसरी येथील लांडेवाडी चाैकातील मधुबन बार अँड रेस्टोरंटमध्ये तसेच पाटणा, बिहार येथे डिसेंबरमध्ये हा प्रकार घडला.
उमेश देविदास अन्वेकर (वय ३५, रा. पिंपळे गुरव, पुणे) यांनी याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अनोळखी वेटरच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी अन्वेकर मधुबन हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेले. बिल देण्यासाठी फिर्यादी यांनी डेबिट कार्ड दिले. अनोळखी आरोपी वेटरने फिर्यादी आणि हॉटेलमधील अन्य ग्राहकांची डेबिट कार्ड घेऊन डेटा क्लोन केला. त्यानंतर वेटरने फिर्यादी यांच्या खात्यातून ५०हजार, बाळासाहेब गणपतराव नजन यांच्या खात्यातून २५ हजार, प्रवीण बापू सोनार यांच्या खात्यातून १९ हजार ५०० रुपये, असे एकूण ९४ हजार ५०० रुपये चोरून फसवणूक केली.