बाणेर : बांधा, वापरा व हस्तांतरित करा (बीओटी) या तत्त्वावर कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी मान्यता देण्यात आलेला नोबेल एक्स्चेंज एन्व्हायर्नमेंट सोल्युशन कंपनीचा बाणेर येथील पालिकेच्या मालकीच्या जागेतील बेकायदेशीर कचरा प्रकल्प प्लांट पालिकेने तातडीने बंद करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.महापालिका आयुक्त कुणाल कुमार, कोथरूड मतदारसंघाच्या आमदार मेधा कुलकर्णी, नगरसेवक अमोल बालवडकर, नगरसेविका स्वप्नाली सायकर, ज्योती कळमकर, ्नराहुल कोकाटे यांनी या प्रकल्पाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. नागरिकांनी या प्लांटमुळे होणाऱ्या त्रासाची गाऱ्हाणी मांडली. प्लांटमुळे या परिसरात सर्वत्र दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. तसेच प्लांटमधून कार्बनडाय आॅक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन सल्फाईड हे घातक वायू बाहेर पडत असल्यामुळे पर्यावरणासह नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. या कंपनीला या ठिकाणी फक्त कचरा विलगीकरणाची परवानगी असून, स्लरी डेव्हलपमेंट प्रोसेससाठी तळेगाव या ठिकाणची मान्यता असल्याचे माहिती अधिकारातून समोर आल्याचे नागरिकांनी या वेळी सांगितले. तसेच या ठिकाणी अनेक महिला कामगार काम करत असून, त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून कोणतीही उपाययोजना केल्याचे दिसून येत नाही. हा प्लांट म्हणजे चॉकलेटची फॅक्टरी नाही, वास येणारच, एवढ्या वासाने कोण मरणार आहे, अशी उद्धट उत्तरे पालिका व कंपनीचे अधिकारी देत असल्याचे या वेळी नागरिकांनी सांगितले. (प्रतिनिधी)शहरातील कचऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी उभारलेले पूर्वीचे प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालत नसताना आणखी एक हजार ५० टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी २०१४मध्ये या कंपनीला मान्यता देण्यात आली. त्या वेळी पालिकेत भाजपाने विरोधी भूमिका घेतल्याने ४७ विरुद्ध ९ मताने हा प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर झाला होता. त्यामुळे आमची भूमिका स्पष्ट आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने घातक ठरणारा हा प्रकल्प असून, तो तातडीने बंद करण्यासाठी प्रयत्नशील राहू. - मेधा कुलकर्णी, आमदार या प्लांटमुळे नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे, ही बाब मान्य आहे. येत्या दहा दिवसांत या प्लांटसंदर्भात नागरिकांचे हित लक्षात घेऊन व सर्व कायदेशीर बाबी तपासून अंतिम निर्णय आम्ही घेऊ.- कुणाल कुमार, आयुक्त, महापालिकासंबंधित प्रकल्पाला भेट देण्यासाठी स्थानिक आमदार, पालिका आयुक्त येणार असल्याची साधी कल्पनाही या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून देण्यात आली नाही. या प्लांटमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे, ही वस्तुस्थिती असून या प्लांटचे स्थलांतर व्हावे ही आमची आग्रही भूमिका आहे. केंद्रात, राज्यात व पालिकेत भाजपाची सत्ता असल्याने ते हा प्रकल्पाचे निश्चित स्थलांतर करतील, अशी आशा आहे.- बाबूराव चांदेरे, नगरसेवकवीजनिर्मितीच्या नावाखाली पालिकेची चक्क फसवणूक सुरू आहे. या प्रकल्पातून किती वीज, गॅसनिर्मिती झाली हे प्रशासनाने जाहीर करावे. कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्प उभारताना या प्रकल्पाचा आराखडा तयार करणे आवश्यक होते. या प्रकल्पाची पर्यावरण, आर्थिकदृष्ट्या छाननी केली गेली नाही. भरवस्तीमध्ये हा प्रकल्प उभारला गेला आहे.- अमोल बालवडकर, नगरसेवक
बेकायदा कचरा प्रकल्प बंद करा
By admin | Published: March 27, 2017 3:19 AM