आधी ठेकेदार ठरवायचा मग टेंडर काढायचे हा सत्ताधारी भाजपचा नवा पायंडा बंद करा; अजित पवारांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 05:12 PM2021-05-21T17:12:54+5:302021-05-21T17:13:10+5:30
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुणे महापालिकेच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी याबाबत पत्र दिले आहे.
पुणे : पुणे महापालिकेतील सत्ताधारी पक्षाकडून प्रशासनावर दबाव आणून ५ ते ७ वर्षाचे टेंडर कालावधी घेण्याचा अट्टहास सुरु आहे. ठेकेदारांची माणसे सर्व नियम अटी शर्ती बनवून देतात आणि प्रशासन त्याला होकार देते असा नवीन पायंडा पालिकेत पडला आहे. त्यामुळे आधी ठेकेदार ठरवायचा मग टेंडर काढायचे भाजपचा नवा पायंडा बंद करा अशी मागणी पुणे महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुणे महापालिकेच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी याबाबत पत्र दिले आहे. यात मुंबई महानगरपालिकेने लसीचे टेंडर मागविले असून त्यामध्ये सहभागी कंपन्यांना संपर्क करून महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 चे कलम६७ (३)(क) चा वापर करून लस खरेदी करावी अशी मागणी पुणे महानगरपालिकेकडे केली आहे. म्युकर मायकोसिस या आजाराचे रुग्ण आढळून येत असताना अशा गंभीर विषयांवर नियोजन करण्याचे सोडून पुणे महानगरपालिका प्रशासनावर दबाव आणत खालील टेंडर प्रक्रिया राबवताना सत्ताधारी एकहाती सत्तेचे ऋण फेडत आहेत.
पुणे महानगरपालिका हद्दीतील ड्रेनेज लाईन व पावसाळी लाईन मधील गाळ काढायचे काम वर्षोनुवर्षे होत असून यावर्षी ७ वर्षाच्या कालावधीसाठी ३४ कोटी रुपयांचे टेंडर काढण्यात आले आहे. या टेंडरच्या अटी व शर्ती पाहता ठेकेदार आधीच ठरला आहे, ठेकेदारांची माणसे सर्व नियम अटी शर्ती बनवून देतात आणि प्रशासन त्याला होकार देते असा नवीन पायंडा महानगरपालिकेत पडला आहे. तसेच सुरक्षा विभागाने ३० कोटी रकमेचे टेंडर काढले असून त्यातील अटी बघितल्या असता भाजपच्या आमदारांशी संबंधित कंपन्या यामध्ये पात्र होणार आहेत. शहरातील नदीतील जलपर्णी काढण्याबाबतची निविदा प्रक्रिया किंवा पालिकेचे ३० वाहनतळ चालविण्यास देण्याचे टेंडर पाहता सत्ताधारी सत्ताधारी पक्षाने ठेकेदारांसाठीच काम करायचे ठरवले आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
पुणेकरांच्या कररूपी पैशांची विविध टेंडरच्या माध्यमातून धुळदाण उडविली जात आहे. कोरोनाच्या काळात गोंधळ घालू नंतर आपली सत्ता नाही, आपण कशासही उत्तरदायित्व नाही अशा भावनेने पुणे महानगरपालिकेत गैरव्यवहार चालू आहेत. मार्च २०२० पासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने जास्तीत जास्त कामे पुढे ढकलण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाला केराची टोपली दाखविली गेली आहे.
महापालिकेचे होणारे आर्थिक नुकसान बघता सर्व वादग्रस्त टेंडर स्थगित करण्याचे आदेश महापालिका आयुक्त यांना करावेत अशी विनंती या पत्राद्वारे उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी केली आहे.