पुणे : शहरातील वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस उग्र होत असतानाच त्यावर महापालिकेकडून कोणत्याही उपाययोजना होत नाहीत. पुणेकर नागरिक मात्र सर्व खापर रस्त्यावरील पोलिसांवर फोडताना दिसतात. त्यामुळे आता वाहतुकीच्या प्रश्नावर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता हे आक्रमक झाले असून, त्यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना पत्र लिहून थेट बीआरटी मार्ग बंद करा, अशी विनंती केली आहे.
या पत्रानंतर हजारो कोटी रुपये खर्च केलेल्या या बीआरटी मार्गाविषयी उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी हे पत्र २६ ऑगस्ट राेजी पाठविले होते. त्याला आता २ महिने उलटून गेल्यानंतरही महापालिकेने त्याबाबत काहीही कृती केली नाही. त्याचा विचारच केला नसल्याचे दिसून आले आहे.
पुणे शहरामध्ये पुणे-नगर रोड, पुणे -सोलापूर रोड व पुणे सातारा रोडवर बीआरटी योजना राबविण्यात आली आहे. हे तीनही राष्ट्रीय महामार्ग आहेत. बाहेरील जिल्ह्यातून याच मार्गाने मोठ्या प्रमाणावर वाहने ये-जा करतात. रस्त्याचा बराचसा भाग हा केवळ पीएमपीसाठी वापरला जातो. त्यामुळे उर्वरित रोडवर वाहतुकीचा अतिरिक्त ताण येऊन वाहतूक कोंडी होते. तसेच अपघाताचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे हा मार्ग बंद करून संपूर्ण रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा, असे गुप्ता यांनी पत्रात म्हटले आहे.
असा आहे बीआरटीचा प्रवास
- शहराच्या वाहतुकीमध्ये सर्वाधिक चर्चेत आणि पांढरा हत्ती म्हणून बीआरटीकडे पाहिले जाते. तत्कालीन खासदार सुरेश कलमाडी यांनी सर्वप्रथम देशात २००६ साली बीआरटी योजना आणली. हडपसर- स्वारगेट- कात्रज या मार्गावर तब्बल १ हजार कोटी रुपये खर्च करून महापालिका निवडणुकीच्या तोंडावर या पहिल्यावहिल्या बीआरटीचे उद्घाटन केले. परदेशातील ही योजना अर्धवट राबविल्याने त्यातून वाहतूक कोंडी, अपघाताचे सत्र सातारा रोडवर वाढले. त्याचा राजकीय लाभ राष्ट्रवादी काँग्रेसने उठवला; पण ते सत्तेवर आल्यावर त्यांनी बीआरटीचा आणखी विस्तार केला. त्यात सातारा रोडवर उड्डाणपुल झाल्याने बीआरटी अकुंचित झाली.
- महापालिका आणि पीएमपी प्रशासन नेहमीच बीआरटीबाबत आग्रही राहिले. नगर रोडला पुन्हा शेकडो कोटी रुपये खर्चून बीआरटी बांधला आणि काही दिवसांतच मेट्रोसाठी तोडण्यात आला. बीआरटीसाठी दोन्ही दरवाजांच्या बसवरूनही गोंधळ घालण्यात आला. त्याचवेळी पिंपरी-चिंचवडमध्ये बीआरटीचा मार्ग अधिक असून, तेथेही अतिशय सुनियोजित पद्धतीने चालते. पुण्यातच अर्धवट नियोजनामुळे बट्टाबोर झाला आहे.
सध्याची बीआरटी
पिंपरी-चिंचवडमधील मार्ग - ४५.५ किमी
पुणे शहरातील मार्ग - २६ किमी
एकूण बीआरटी बस - १ हजार ५२५
पीएमपीच्या बीआरटी बस - ६६८
भाडेतत्त्वावरील बीआरटी बस - ६६२
ई-बस बीआरटी - ३००
बीआरटी मार्ग हा सध्या पीएमपीएमएलच्या अखत्यारित आहे. त्यामुळे त्यांच्याशी चर्चा करून, पुणे पोलिसांनी दिलेल्या निवेदनाबाबत पुढील निर्णय घेतला जाईल.
- विक्रम कुमार, आयुक्त, पुणे महापालिका