जयंत पाटलांसोबत बंद दाराआड भेट; काय चर्चा झाली? अजित पवारांकडून तातडीने खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 13:14 IST2025-03-22T13:13:54+5:302025-03-22T13:14:31+5:30

भेटीबाबत तर्क-वितर्क लावले जाऊ लागल्यानंतर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधत स्पष्टीकरण दिलं आहे.

Closed door meeting with Jayant Patil What was discussed Ajit Pawar immediately clarifies | जयंत पाटलांसोबत बंद दाराआड भेट; काय चर्चा झाली? अजित पवारांकडून तातडीने खुलासा

जयंत पाटलांसोबत बंद दाराआड भेट; काय चर्चा झाली? अजित पवारांकडून तातडीने खुलासा

NCP Ajit Pawar: पुण्यात आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या गव्हर्निंग कौन्सिलची बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र या बैठकीआधी झालेली उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची बंद दाराआडची भेट चर्चेचा विषय ठरली. या दोन्ही नेत्यांमध्ये नक्की कोणत्या विषयांवर चर्चा झाली, याबाबत तर्क-वितर्क लावले जाऊ लागल्यानंतर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधत स्पष्टीकरण दिलं आहे.

"कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय) संबंधीच्या एका कमिटीत जयंत पाटील यांचा समावेश आहे. त्यांनी याबाबतच्या बैठकाही घेतल्या आहेत. नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात मी कृषी क्षेत्रातील एआयच्या वापराबाबत भाष्य करत ५०० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. एआयचा वापर करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याचा आपला प्रयत्न असणार आहे. या पार्श्वभूमीवर एआयच्या संदर्भात जयंत पाटील यांचे काय म्हणणे आहे, काय सूचना आहेत, ते जाणून घेण्याचा मी प्रयत्न केला. पण आमच्या भेटीनंतर बाहेर वेगळ्या प्रकारच्या बातम्या पसरल्या. मला त्यासंदर्भातील फोन आल्यानंतर मी सांगितले की त्यात कोणतेही तथ्य नाही," असा खुलासा अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे.

भेटीत राजकीय समीकरणांची चर्चा?

राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर दोन्ही गट एकत्र यावेत, यासाठी विविध नेत्यांमध्ये वारंवार चर्चा झाल्या आहेत. शरद पवार आणि अजित पवार यांच्यातही एका उद्योगपतीच्या घरी भेट झाली होती. विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना-राष्ट्रवादीच्या महायुतीला ऐतिहासिक बहुमत मिळालं असलं तरी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचा गट आपल्यासोबत यावा, यासाठी अजित पवार हे प्रयत्नशील असल्याचं दिसतं. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी यासाठी आपल्याला आवाहन केल्याचा दावा नुकताच जयंत पाटील यांनी एका मुलाखतीत केला होता. त्यानंतर आता अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात बंद दाराआड १५ ते २० मिनिटांच्या भेटीत राजकीय समीकरणांवर चर्चा झाली नसेल तरच नवल. अजित पवार यांनी माध्यमांसमोर बोलताना आमच्या भेटीत फक्त एआयवर चर्चा झाल्याचा दावा केला असला तरी दोन्ही नेत्यांमध्ये राष्ट्रवादीच्या एकत्रि‍करणावर चर्चा झाली असण्याची दाट शक्यता आहे. कारण या भेटीवेळी अजित पवार यांना भेटण्यासाठी आलेल्या इतर लोकांना बाहेर जाण्यास सांगण्यात आले होते. एवढेच काय सुरक्षारक्षक आणि स्वीय सहाय्यक यांनाही केबिनबाहेर जाण्यास सांगण्यात आल्याचे समजते. 

दरम्यान, अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यातील या भेटीनंतर आता आगामी काळात राष्ट्रवादीच्या एकत्रि‍करणाबाबत काही हालचाली होतात का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Web Title: Closed door meeting with Jayant Patil What was discussed Ajit Pawar immediately clarifies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.