पुणे: काेलकात्यातील आर. जी. कर वैदयकीय महाविदयालयातील दुस-या वर्षाला शिकणा-या विदयार्थिनीवर अत्याचार आणि तिची हत्या (Kolkata Doctor Case) केल्याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असाेसिएशन (IMA) ने एकदिवशीय देशव्यापी सेवाबंद संप पुकारला आहे. हा संप (दि. १७) राेजी शनिवारी सकाळी ६ ते रविवारी सकाळी ६ वाजेपर्यंत २४ तास राहणार आहे. हा संप पुण्यासह संपूर्ण राज्यात असून यादरम्यान खासगी रुग्णालयांतील तातडीच्या सेवा वगळता बाहयरुग्ण विभाग (OPD) बंद राहणार असून, तातडीच्या नसलेल्या शस्त्रक्रियाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
आयएमए चे राष्ट्रीय अध्यक्ष डाॅ. आर. व्ही. अशाेकन यांनी पत्रकाद्वारे ही माहीती दिली आहे. आयएमए ही माॅडर्न मेडिसिन प्रॅक्टिशर डाॅक्टरांची सर्वांत माेठी संघटना आहे. त्यांनी याबाबत शुक्रवारी पत्रक जारी करत ही माहीती दिली. त्यामध्ये म्हटले आहे की, काेलकात्यामधील महिला डाॅक्टराच्या अत्याचार व हत्या प्रकरणामुळे देशभरात डाॅक्टर कम्युनिटीकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान तेथील कायदा सुव्यवस्था पाेलीस यंत्रणेने संवेदनशीलतेने हाताळलेली नाही. काेलकाता उच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास सीबीआय कडे साेपवला आहे आणि झालेल्या तपासाबाबद नाराजी व्यक्त केली आहे. तसेच स्वातंत्र्यदिनी पंधरा ऑगस्ट राेजी काेलकात्यातील त्याच रुग्णालयात काही लाेकांनी रुग्णालयात घुसून वाॅर्ड आणि जेथे महिला डाॅक्टरचा मृतदेह आढळला हाेता तेथे ताेडफाेड केली. डाॅक्टरांना सुरक्षा पुरवणे हे शासनाचे काम आहे. महिला डाॅक्टर नेहमीच अशा अत्याचाराला बळी पडण्याची शक्यता असते. अशा घटनांच्या विराेधात देशभरातील सर्वच डाॅक्टर समुदाय आंदाेलने करत आहे. त्यामुळे आज एक दिवस हा देशव्यापी संप पुकारण्यात येत आहे.
याबाबत पुणे आयएमए चे अध्यक्ष डाॅ. राजन संचेती म्हणाले की, आयएमए च्या देशव्यापी संपाला पुणे आयएमएचा देखील पाठिंबा आहे. शनिवारी खासगी रुग्णालयांतील बाहयरुग्ण विभाग बंद राहणार आहेत. तसेच तातडीच्या वगळता इतर वैदयकीय सेवा शनिवारी बंद राहतील. दरम्यान याबाबत जनरल प्रॅक्टिशनर्स असाेसिएशनचे अध्यक्ष डाॅ. हरिभाउ साेनावणे म्हटले की, त्यांचाही बंदला पाठिंबा असून सर्व डाॅक्टर सदस्य हे काळया फिती लावून सेवा बजावणार आहेत.