पुणे : पुणे कॅँटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत असलेले दोन रस्ते संरक्षणाच्या नावाखाली नागरिकांसाठी बंद करण्यात आले होते. हे रस्ते आता खुले करण्यात येणार आहेत. केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतेच बंद रस्ते खुले करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पुणे कॅँटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील घोरपडी येथील एक व वानवडी येथील एक असे दोन रस्ते खुले होणार आहे. पुणे कॅँटोन्मेंट परिसरातील घोरपडी येथील अनंत थिएटर ते कोरेगाव पार्क रोड आणि वानवडी येथील राईट फ्लंक रोड बंद करण्यात आलेले आहेत. हे रस्ते आता लवकरच नागरिकांसाठी खुले होणार आहे. या बंद रस्त्यांमुळे नागरिकांना खूप लांबून ये-जा करावी लागत असे. प्रामुख्याने घोरपडी येथील कोणाचे मयत असेल, तर त्यांना सुमारे सात किलोमीटर वळसा घालून स्मशानभूमीला जावे लागत असे. तसेच घोरपडीमधील नागरिकांना कोरेगाव पार्कला जाण्यासाठी बंद केलेला रस्ता जवळचा होता. तो बंद केल्यानंतर मुंढव्याकडून कोरेगाव पार्कला जावे लागत असे. त्यामुळे वेळ आणि इंधन दोन्ही खर्च होत असे. हा सर्व त्रास आता कमी होणार आहे. दरम्यान, या रोड संदर्भात खासदार अनिल शिरोळे ह्यांनी तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्याकडे जून २०१६ पासून पाठपुरावा केला होता. त्यानंतर देखील संरक्षण राज्य मंत्री सुभाष भामरे, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे हा प्रश्न मांडला होता. देशभरातील कॅँटोन्मेंट बोर्डाच्या विविध प्रश्नासंबंधी केंद्रीय संरक्षण मंत्रालयातर्फे ६३ बोर्डाच्या उपाध्यक्षांसोबत बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला खासदार अनिल शिरोळे, उपाध्यक्ष प्रियांका श्रीगिरी उपस्थित होते. त्यामध्ये देखील या प्रश्नाबाबत चर्चा झाली होती. --------------- गेल्या दोन-तीन वर्षांपासून घोरपडी येथील रस्ता संरक्षण विभागाने बंद केला. त्यामुळे घोरपडीमधून कोरेगाव पार्कला जाणाऱ्यांची गैरसोय झाली. स्मशानभूमीत जाण्यासाठी अंत्ययात्रा सुमारे सात किलोमीटरची होत असे. मुंढव्याकडून स्मशानभूमीत जावे लागत असे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप होता. आता या निर्णयामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. - राजाभाऊ तिखे, सामाजिक कार्यकर्ते -------------------- केंद्रीय संरक्षण मंत्रालयाकडे कॅँटोन्मेंट परिसरातील बंद रस्त्याबाबत सोमवारी आदेश देण्यात आला आहे. त्यामुळे आता दोन-तीन दिवसात बंद रस्ते नागरिकांसाठी खुले होणार आहेत. घोरपडीमधील एक आणि वानवडी येथील राईट फ्लॅँक असे दोन रस्ते बंद करण्यात आले होते. - प्रियांका श्रीगिरी, उपाध्यक्ष, पुणे कॅँटोन्मेंट बोर्ड