दौंड : मुदत संपल्याने दौंडच्या नगरमोरीजवळील तसेच भीमा-नदीच्या परिसरातील टोलनाके अखेर बंद करण्यात आले. रस्त्याची बिकट अवस्था, सुविधांचा अभाव असतानाही येथे वसुली सुरू होती. ती बंद झाल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. भीमा नदीजवळील टोलनाका हा गुन्हेगारीचा अड्डाच बनला होता.रेल्वे उड्डाणपूल ते नगरमोरी चौक या ठिकाणी टोलनाका होता. उड्डाणपूल आणि त्या परिसरातील रस्त्याच्यासंदर्भात टोल वसूल केला जात होता. मात्र, उड्डाणपुलावर वाहतुकीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कुठल्याही सुविधा नाहीत. रात्री अंधाराचे साम्राज्य असते. तसेच पुलाची दोन्ही बाजूंनी रचना चढत्या आणि उतरत्या पद्धतीने आहे. त्यामुळे मुळात हा पूल चुकीच्या पद्धतीने उभारलेला असल्याने वेळोवेळी अपघातदेखील झालेले आहेत. पुलापासून ते नगरमोरी चौकापर्यंत रस्त्याचे तीन तेरा वाजलेले आहे. असे असतानाही येथे टोल वसूल केला जात होता.दौंड-अहमदनगर रस्त्यावरील भीमा-नदीच्या परिसरात असलेल्या टोलनाक्यावर बऱ्याचदा हाणामाऱ्या झाल्या आहे. परराज्यातील वाहनचालकाच्या गाडीचा नंबर पाहून त्यांची लुटमार केली जात असे. हा टोलनाका गुन्हेगारीचा अड्डा झाला होता. रस्त्याची तर बिकट अवस्था आहे. रस्ता खड्ड्यात की खड्डा रस्त्यात हेच समजत नाही. तसेच टोलनाक्यापासून काही अंतरावर भीमा नदीचा पूल आहे. या पुलावरून जड वाहन गेले तर पूल खाली वर होतो. पुलाला हादरे बसतात. या पुलावरून एखाद्या वाहनाला कधी जलसमाधी मिळेल, याची शाश्वती नाही. तरीदेखील गेल्या अनेक वर्षांपासून टोल वसूल केला जात होता. विशेषत: सिद्धटेक येथील भाविकांना याचा मोठा त्रास होत असे. गणेशभक्त सिद्धिविनायकला जाण्यासाठी दौंडमधून जावे लागते. मात्र दर्शनाला जाता जाता भीमा नदीपात्राच्या टोलनाक्यावरील दादागिरी सहन करावी लागत होती. टोलनाके बंद झाल्यामुळे समाधान व्यक्त केले जात आहे. (वार्ताहर)दोन्ही टोलनाके उद्ध्वस्त करासध्याच्या परिस्थितीत दोन्ही टोलनाके बंद झालेले आहेत. ते टोलनाके उद्ध्वस्त करावेत. ते तसेच ठेवले तर गुन्हेगारीचे तसेच दारूचे अड्डे होतील. त्यातच रात्री-बेरात्री या रिकाम्या टोलनाक्यातून बाहेरच्या राज्यातील आणि जिल्ह्यातील वाहनचालकाकडून टोलवसुली केली जाऊ शकते. त्याकामी बोगस पावत्या छापल्या जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा दोन्ही टोलनाके उद्ध्वस्त करावे; अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल, असा इशारा शिवसेना पुणे जिल्हा उपप्रमुख राजेंद्र खटी यांनी दलिा आहे.माहितीसाठी फलक लावणार सिद्धिविनायकाच्या भक्तांंच्या वाहनासह इतर राज्यातून तसेच परराज्यांतून येणाऱ्या वाहनचालकांच्या माहितीसाठी ‘‘दोन्ही टोलनाके बंद झाले आहेत. तेव्हा कोणी टोल भरू नये’’ अशा आशयाचे फलक दोन्ही टोलनाक्यांच्या परिसरात मराठा महासंघाच्या वतीने लावण्यात येणार आहेत.
दौंडचे ‘वसुली’नाके अखेर बंद
By admin | Published: October 05, 2015 1:56 AM