विज्ञान व तंत्रज्ञान, वाणिज्य व व्यवस्थापन, मानवविज्ञान आणि आंतर-विद्याशाखीय अभ्यास या चारही विद्याशाखेअंतर्गत येणारे विद्यापीठाच्या विविध विभागांमधील प्रत्यक्ष वर्ग सोमवारपासून सुरू होणार होते. मात्र, विद्यापीठाच्या वसतिगृहात राहणारे सुमारे ८० टक्के विद्यार्थीच नियमितपणे विभागांतील वर्गात उपस्थितीत राहतात. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वसतिगृह सुरू करण्यासाठी विद्यापीठ प्रशासनातर्फे नियमावली तयार करण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे विद्यापीठातील वसतिगृह अद्याप सुरू करण्यात आले नाहीत. परंतु, त्याचा परिणाम विद्यापीठातील विभागांमध्ये ऑफलाईन पद्धतीने घेतल्या जाणाऱ्या वर्गांवर झाला.
विद्यापीठाचे मुख्य वसतिगृह प्रमुख सचिन बल्लाळ म्हणाले, विद्यापीठाने वसतिगृह सुरू करण्याबाबत आवश्यक तयारी पूर्ण केली आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठामध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी कोणती काळजी घ्यावी, याबाबत नियमावली तयार केली जात आहे. विद्यापीठातील विभागांमध्ये शिक्षण घेणारे बहुतांश विद्यार्थी वसतिगृहात राहतात. त्यामुळे सोमवारी पुणे शहर व शहर परिसरातील विद्यार्थी विभागांमध्ये प्रत्यक्ष वर्गात शिक्षण घेण्यासाठी आले असावेत.