जेजुरी (पुणे) : येथील पुणे -पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील कडेपठार कमानीनजीक असलेल्या कापड दुकानाचा पत्रा कापून आणि पीओपी फोडून आतमध्ये प्रवेश करत गल्ल्यातील ७० हजारांची रोकड लंपास करण्यात आली आहे.
ही घटना गुरुवारी (दि.२९) रात्री १० ते शुक्रवारी (दि.३०) पहाटेच्या दरम्यान घडली आहे. विशेष म्हणजे या दुकानात लहान मुलांसह तरुण वर्गाचे रेडिमेड शर्ट -पॅन्ट व महिलांचे साडी दालन आहे. मात्र अज्ञात चोरट्याने इतर कोणत्याही वस्तूला, मालाला हात न लावता फक्त गल्ल्याचे कुलूप उचकटून रोकड लंपास केली आहे. याबाबत प्रनिकेत राजकुमार दोशी (रा.जेजुरी) यांनी फिर्याद दाखल केली आहे.
पुणे -पंढरपूर मार्गावर कडेपठार कमानीनजीक प्रनिकेत दोशी यांचे केशर कलेक्शन नावाचे कापड दुकान आहे. गुरुवारी (दि.२९) रात्री ९ वाजण्याचे दरम्यान त्यांनी दुकान बंद केले. सकाळी ९ वाजण्याचे सुमारास त्यांनी पुन्हा दुकान उघडले असता छताचा पीओपी फुटलेल्या अवस्थेत दिसून आला. तर त्यावरील छताचा पत्रा कापलेला होता. इतर कोणत्याही वस्तूला हात न लावता ,चोरट्याने फक्त गल्ला उचकटून त्यातील ७० हजारांची रोकड लंपास केली असल्याचे निदर्शनास आले. घडलेल्या घटनेची जेजुरी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात फिर्याद दाखल करण्यात आली असून पोलिस निरीक्षक उमेश तावसकर यांचे मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.