मंचर (पुणे) : कळंब येथे रात्री विजेच्या कडकडाटासह ढगफुटीसारखा पाऊस झाल्याने पुणे-नाशिक महामार्ग संपूर्णपणे पाण्याखाली गेला होता, त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला. कळंब येथे गेल्या आठवड्यात मुसळधार पाऊस पडला होता. त्यानंतर दुसऱ्यांदा ढगफुटी झाल्याने ओढ्यांना मोठ्या प्रमाणावर पूर आला होता. त्यामुळे पुणे-नाशिक महामार्गावर पाणीच पाणी झाल्याने वाहनचालकांना रस्ता समजायला मार्ग नव्हता.
त्यावेळी नितीन भालेराव व त्यांच्या सहकाऱ्यांनी भर पावसामध्ये रस्त्यात उभे राहून वाहनचालकांना मार्गस्थ केले. काही ठिकाणी पुणे-नाशिक महामार्गावर कमरेइतके पाणी जमा झाल्याने भीतीपोटी दुचाकी वाहनचालक पाणी कमी होण्याची वाट पाहत होते. दुचाकी जाण्यास तर मार्गच राहिला नव्हता. तसेच शिरामळा वस्तीवरील रस्ताही ढगफुटी झाल्याने जवळपास कमरेइतक्या पाण्याखाली गेला होता.
पुणे-नाशिक महामार्ग आणि शिरामळा रस्ता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाल्याने वाहनचालकांना मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागले. यासाठी स्थानिक नागरिकांनी मदत केल्याची माहिती सरपंच राजश्री भालेराव आणि उपसरपंच डॉ. सचिन भालेराव यांनी दिली आहे. शिरामळा वस्तीवरील वाहनचालकांना सुरळीत मार्ग दाखवण्याचे काम उद्योजक सुनील भालेराव, मंगेश भालेराव, वरुण पिंगळे यांच्यासह वस्तीवरील तरुणांनी केले.
वारंवार मोरीमध्ये कचरा अडकून ओढ्याला आलेल्या पुरामुळे रस्ता पाणीमय होत असल्याचे लक्षात घेता शिरामळा येथील मोरीमध्ये गुंतलेला कचरा काढण्याचे सामाजिक काम जालिंदर पिंगळे, वरुण पिंगळे, राहुल भालेराव, धर्मेंद्र भालेराव, दीपक भालेराव, मनोहर बांगर या तरुणांनी स्वतः पुढाकार घेऊन सकाळी ओढ्याच्या मोरीची साफसफाई केली. घरामध्ये व दुकानांमध्ये पाणी घुसल्याने नुकसान झाले आहे.