पुणे : अरबी समुद्रावर हवेची चक्रीय स्थिती आहे. त्यापासून गुजरातपर्यंत द्रोणीय स्थिती निर्माण झाले आहे. उत्तरेकडील आणि पूर्वेकडील वारे महाराष्ट्रात एकत्र येत आहेत. त्यामुळे राज्यात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पुणे परिसरात ढगाळ वातावरण राहणार असून, काही ठिकाणी अतिहलक्या पावसाची शक्यता आहे. पुढील ७२ तासांत सकाळी हलके धुके पडेल. कमाल व किमान तापमानात घट होईल आणि थंडी जाणवेल, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.
राज्यात बहुतांश भागात विदर्भ वगळून पुढील तीन दिवस अतिहलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. धुळे, जळगाव, नंदूरबार, नाशिक व छत्रपती संभाजीनगर येथे येलो अलर्ट दिला आहे. ९ जानेवारीला विदर्भात हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. १० जानेवारीनंतर राज्यातील तापमान कोरडे राहील. राज्यात ८ जानेवारीनंतर किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. विदर्भात किमान तापमानात वाढ होईल. दरम्यान, पुण्यात कमाल तापमान २९.५ तर किमान तापमान १५ अंश सेल्सिअस नोंदले गेले.