बारामतीत एकनाथ शिंदेंनी दिलं आश्वासन, शरद पवारांचंही नाव घेतलं; नेमकं काय म्हणाले?, पाहा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2024 04:14 PM2024-03-02T16:14:48+5:302024-03-02T16:15:02+5:30
बारामतीमधील विकासकामांना निधी कमी पडू देणार नाही, असं आश्वासन एकनाथ शिंदेंनी दिले.
पुणे जिल्ह्यातील बारामती येथे आयोजित करण्यात आलेल्या विभागस्तरीय 'नमो महारोजगार मेळाव्या'चा उद्घाटन सोहळा आज संपन्न झाला. यासोबतच बारामती येथील विविध विकासकामांचे उद्घाटन आणि लोकार्पण देखील करण्यात आले.
आज बारामती येथे आयोजित करण्यात आलेल्या नमो महारोजगार मेळाव्यातून स्वतःचे आणि राज्याचे भविष्य घडवण्याची संधी तरुणांना मिळाली आहे. राज्यातील तरुणांना ७५ हजार रोजगार देण्याची घोषणा सरकारने केली होती. आजवर १ लाख तरुणांना रोजगार दिले असून आज याठिकाणी देखील २५ हजार तरुणांना रोजगार देण्यात येतील असे सांगितले. शासन आपल्या दारी मधूनही २ कोटी ६० लाख नागरिकांना विविध योजनांचे थेट लाभ मिळवून देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
बारामतीत उभ्या राहिलेल्या या इमारती विकासाचे मॉडेल आहे. या इमारतीत कुठेही दर्जाशी तडजोड केली गेलेली नाही. पोलीस हे प्रत्येक परिस्थितीत काम करत असतात त्यामुळे त्यांना चांगली घरे देणे गरजेचे आहे ते काम बारामतीमध्ये झाले आहे. येथील बसस्टँड देखील मॉडेल बसस्टँड आहे. बारामतीचा विकास खासदार शरद पवार यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही केला असून यापुढे देखील बारामतीमधील विकासकामांना निधी कमी पडू देणार नाही, असं आश्वासन एकनाथ शिंदेंनी दिले.
विभागस्तरीय नमो महारोजगार मेळावा व विविध विकासकामांचे लोकार्पण
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) March 2, 2024
🗓️ 02-03-2024📍बारामती https://t.co/qlfdcWMnVF
पोलीस वसाहतींचे उद्घाटन-
बऱ्हाणपूर येथील पोलीस उपमुख्यालय, नवीन बारामती बस स्थानक, अपर पोलीस अधीक्षक, वाहतूक शाखा, बारामती पोलीस ठाणे तसेच पोलीस वसाहतींचे उद्घाटन व पोलीस वाहनांचे लोकार्पण करण्यात आले. पोलीस कर्मचाऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात घरांच्या आणि गाड्यांच्या चाव्यांचे वाटप करण्यात आले.