उद्धव ठाकरे यांनी खोटं बोलून शिवसेना-भाजपा युती तोडली. सत्ता मिळाली तेव्हा स्वतः टूणकन उडी मारून मुख्यमंत्री झाले, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. तसेच मला कोणत्याही पदाचा मोह नसून पक्ष वाचवण्यासाठी मी वेगळी भूमिका घेतली असल्याचे एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.
शिवसेनेच्यावतीने आज आयोजित करण्यात आलेल्या 'शिवसंकल्प अभियाना'तील पहिला मेळावा आज शिरूर लोकसभा मतदारसंघातील राजगुरू नगर येथे मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
दीड वर्षांपूर्वी मी घेतलेल्या निर्णयाला आपण सगळ्यांनी मिळून साथ दिलीत म्हणून इथवर वाटचाल करणे शक्य झाले आहे. त्यामुळे मला साथ देणाऱ्या प्रत्येक शिवसैनिकाचे आभार मानतो, असं एकनाथ शिंदे म्हणाले. वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे विचार आणि वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण अंगिकारून आपण ही वाटचाल करत असून सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी सारे मिळून झटत असल्याचे एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात देश नव्या उंचीवर-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात देश नव्या उंचीवर जाऊन पोहोचला. ५०-६० वर्षात देशभरात जेवढे काम झाले नाही ते त्यांनी ९ वर्षांच्या कार्यकाळात करून दाखवले. त्यामुळे निवडणुकीच्या काळात कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता सध्याच्या सकारात्मक वातावरणाचा फायदा घेऊन मोदीजींचे हात बळकट करा. येत्या लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणून 'मिशन ४८' यशस्वी करा असे आवाहन एकनाथ शिंदेंनी उपस्थित शिवसैनिकांना केले.