तपास पूर्ण झाल्यानंतर मुंडेंविषयी मुख्यमंत्री फडणवीस निर्णय घेतील : चंद्रशेखर बावनकुळे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 20:46 IST2025-01-10T20:45:26+5:302025-01-10T20:46:04+5:30
तपासात काही आढळून आले तर राजीनामा मागितला जाऊ शकतो.

तपास पूर्ण झाल्यानंतर मुंडेंविषयी मुख्यमंत्री फडणवीस निर्णय घेतील : चंद्रशेखर बावनकुळे
पुणे : मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी तिन्ही संस्थांचा तपास पूर्ण झाल्यानंतर राज्य सरकारला योग्य वाटल्यास अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी स्पष्टोक्ती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. त्यामुळे याबाबत चर्चा करणे आता योग्य नाही असेही ते म्हणाले.
पुण्यात महसूल शेती विकास महामंडळ नोंदणी मुद्रांक शुल्क विभाग व जमाबंदी आदी विभागांचा आढावा घेण्यासाठी बावनकुळे आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. तपासात काही आढळून आले तर राजीनामा मागितला जाऊ शकतो. आता याबाबत चर्चा करणे गरजेचे नाही. संतोष देशमुख यांच्या खुनाचा तपास योग्य दिशेने सुरू आहे. तिन्ही संस्थांचा योग्य तपास झाल्यानंतर राज्य सरकारला वाटले तर धनंजय मुंडे यांच्याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील. धनंजय मुंडे यांच्याबाबत चर्चा करणे योग्य नाही. कुठल्याही व्यक्तीची बदनामी केली जाऊ नये. कोणालाही दोष देऊ नये. मात्र, ज्या दिवशी दोषी आढळतील, त्या दिवशी कोणालाही सोडले जाणार नाही, अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका आहे.
गुन्हा झाल्यानंतर गुन्हेगारांना शिक्षा होण्यासाठी जे काही लागते, ते सरकार करत आहे. गृहखाते प्रभावीपणे आणि पारदर्शकपणे काम करत आहे. कुठल्याही व्यक्तीला वाचविण्याचे काम केले जात नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. राज्य सरकार हे द्वेषापोटी आणि आकसापोटी कोणावरही कारवाई करणार नाही. विरोधी पक्ष असो अथवा कुठलाही पक्ष असो, नियमाप्रमाणे कारवाई केली जाईल. योग्य दिशेने तपास सुरू असून सरकार योग्य दिशेने काम करत आहे, असेही ते म्हणाले. आतापर्यंत कुठल्याही अधिकाऱ्याने या प्रकरणात मुंडे यांचे नाव आले असल्याचे सांगितले नाही. त्यांच्या मोबाइलमध्ये या संदर्भात काही आढळून आले आहे का, नेमका कुठे दोष आहे, हे पाहिले पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अनेक विषय राजकारणाच्या पलीकडचे
वाल्मीक कराड यांचे मुंडे यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध असल्यावरून टीका होत आहे. त्याबाबत बावनकुळे म्हणाले, कोणी कोणाचा मित्र असू शकतो. चांगल्या काळात काम केले तर त्याच्या सोबत राहतो. त्यानंतर बिघडला असेल किंवा गुन्हा केला असेल तर त्याच्या सोबत संबंध असेल तर ही गोष्ट वेगळी. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री फडणवीस यांची सातत्याने भेट घेत आहेत. यावर ते म्हणाले, एखाद्या विषयासाठी मुख्यमंत्र्यांना भेटले असतील तर राजकारणाशी याचा संबंध नाही. अनेक विषय हे राजकारणाच्या पलीकडचे असतात. आदित्य ठाकरे एखाद्या चांगल्या विषयासाठी मुख्यमंत्र्यांना भेटत असतील तर यात गैर नाही.