खासदार सुळे यांनी ऊर्जामंत्र्यांशी केली चर्चा
बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघातील बारामती, दौंड आणि पुरंदर तालुक्यातील काही गावांमध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्प सुरू करण्यास लवकरात लवकर मंजुरी मिळावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे केली. दरम्यान, यावेळी राऊत यांना अन्य काही प्रश्नांसदर्भात लेखी निवेदनही दिले.
ऊर्जामंत्री राऊत यांची भेट घेऊन सुळे यांनी या मुख्य विषयासह बारामती लोकसभा मतदारसंघातील विजेशी संबंधित अन्य विषयांवर चर्चा केली. पुणे जिल्हा विद्युत सनियंत्रण समितीचे सदस्य प्रवीण शिंदे यावेळी उपस्थित होते. यावेळी ऊर्जामंत्री राऊत यांनी सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
बारामती लोकसभा मतदारसंघात पुरंदर तालुक्यातील कोळविहिरे, दिवे, कोथळे, पिंपरे आणि माहूर, दौंड तालुक्यातील हिंगणी बेर्डी, राहू तसेच बारामती तालुक्यातील मुरूम, देऊळगाव रसाळ, वाकी, गदरवाडी, वाढाणे, पणदरे, जळगाव सुपे, मोढवे, वडगाव निंबाळकर, खालकर वाडी, या गावांत मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्प सुरू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. याबाबत महावितरणच्या बारामती मंडळाने ऊर्जा मंत्रालयालाकडे यापूर्वीच प्रस्ताव पाठवला आहे. त्याची आठवण करून देत त्या प्रस्तावांना मंजुरी मिळावी, अशी मागणी सुळे यांनी राऊत यांच्याकडे यावेळी केली.
याबरोबरच वेल्हे तालुका ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन प्लांटसाठी ६३ के.व्ही.च्या ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करून द्यावा, भाटघर येथील सबस्टेशन तीन वर्षांपूर्वी पाण्यात बुडाले होते. त्याची दुरुस्ती आणि नूतनीकरण करण्यात यावे, मुळशी तालुक्यातील भूगाव येथे १३२ के.व्ही. सबस्टेशन मंजूर झाले आहे, त्याचे काम तातडीने सुरू करण्यात यावे. वीज वितारणसंदर्भात भोर तालुक्याचा काही भाग पुणे ग्रामीण मंडळ, तर काही भाग बारामती ग्रामीण मंडळाला जोडला आहे. परिणामी, वीज ग्राहकांना दोन वेगवेगळ्या ठिकाणी जावे लागते. ग्राहकांचा हा त्रास कमी करण्यासाठी संपूर्ण भोर तालुक्याचा समावेश पुणे ग्रामीण मंडळाला जोडावा, अशी मागणी त्यांनी केली.
बारामती लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्पास परवानगी देण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे केली.
१००९२०२१ बारामती—०१