पुणे: कोरोना रुग्ण जर वेगाने वाढत असतील तर काही शहरांबाबत निर्णय लॉकडाऊनसारखा कठोर निर्णय घ्यावा लागेल,असे मुख्यमंत्र्यांचं म्हणणे आहे. दरम्यान, उद्या पुन्हा राज्यातील कोरोना परिस्थितीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा होणार आहे. यानंतर लॉकडाऊन की आणखी कठोर निर्बंध लागू करायचे याबाबत मुख्यमंत्री निर्णय जाहीर करतील, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्रीराजेश टोपे यांनी दिली आहे. मात्र, लॉकडाऊन जर टाळायचा असेल तर जनतेने नियम पाळायला हवेत असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
पुण्यात राजेश टोपे यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी कोरोना परिस्थितीवर भाष्य केले. टोपे म्हणाले, सध्या पुरेशा प्रमाणात बेड उपलब्ध आहेत. मात्र वाढती संख्या लक्षात घेता आणखी तयारी करावी लागणार आहे. तसेच केंद्र सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन / अंमलबजावणी राज्यात होत आहे. आजमितीला राज्यात २ लाख १० हजार सक्रिय रुग्ण असून त्यापैकी ८५ टक्के लक्षण विरहित आहे. ०.४ टक्के मृत्युदर आहे. पण याचवेळी मुंबई, पुणे , नागपूर सारख्या शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
सध्या लागू असलेल्या निर्बंधांचे सक्तीने अंमलबजावणी करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. रोज सरासरी ३ लाख लसीकरण होत आहे. आतापर्यंत राज्यात ४५ लाख लसीकरण पूर्ण झाले आहे. कोविशिल्डच्या दोन डोसमध्ये ४५ ते ६० दिवसांचे अंतर ठेवण्याच्या सूचना केंद्राने दिल्या आहेत.
मात्र, ज्या ठिकाणी निवडणुका सुरू आहेत. तसेच गुजरातमध्ये सुरू असलेल्या क्रिकेट सामन्यांदरम्यान गाईडलाईन्सची अंमलबाजवणी होताना दिसत नाही ही अत्यंत गंभीर बाब आहे.
इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची रुग्ण वाढीची टक्केवारी कमी आहे. आपली ८० टक्के असेल तर इतर ठिकाणी २००टक्के आहे. हाफकीनमध्ये लसीच्या निर्मितीला परवानगी मिळावी.आम्ही तिथे १७ लाख डोस तयार करू शकतो याविषयी मुख्यमंत्र्यांसोबत रविवारी बोलणे झाले आहे, असेही टोपे यांनी यावेळी सांगितले.......
खासगी हॉस्पिटलमध्ये कोविड रुग्णांसाठी ८० टक्के खाटा ठेवण्यात येतील. तसेच नियमितपणे अपडेट केला जाईल. याचवेळी रुग्णांना वेळेत उपचार मिळेल याला प्राधान्य देणार आहे.
- आरोग्यमंत्री राजेश टोपे.