लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : पुणे, मुंबई व राज्यातील एकूण कोरोना स्थितीबाबत उच्च न्यायालयाने त्यांचे निरीक्षण नोंदवले आहे. त्याआधारे कडक लॉकडाऊन करायचा की नाही, याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
कोरोना आढावा बैठकीनंतर पवार शुक्रवारी पत्रकारांशी बोलत होते. जिल्हा आणि राज्यस्तरीय कोरोना रुग्ण आकडेवारीत पुण्यात होणाऱ्या चुकीबद्दल पवारांनी मौन पाळले. मुंबईच्या कोरोना कामाचे देशात कौतुक झाले आहे. पुण्यातही रुग्णसंख्या कमी होत आहे, पण त्याच वेळी ग्रामीण भागात वाढत आहे. बारामतीमध्ये कडक लॉकडाऊन केले, कारण वैद्यकीय तज्ज्ञांनी तसा सल्ला दिला. भौगोलिक स्थिती, लोकसंख्येच्या तुलनेत आरोग्याच्या अपुऱ्या सुविधा यातून तो निर्णय झाला. राज्यातील स्थितीची मुख्यमंत्र्यांना माहिती आहे. तेच यासंदर्भात निर्णय घेतील, असे पवार म्हणाले.