पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांची हाेणारी पायपीट आता थांबणार आहे. विद्यापीठात महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) या कंपनीकडून देणगी म्हणून मिळालेल्या सीएनजी बसेसची सेवा आजापासून सुरु करण्यात आली. ही सेवा सकाळी 7 ते सायंकाळी 7 या वेळेत सुरु राहणार आहे. ही सेवा पहिल्या तीन महिन्यांसाठी प्रायाेगिक पातळीवर विनामूल्य उपलब्ध करुन दिली जाणार आहे. या सेवेला मिळणारा प्रतिसाद पाहून त्यासाठी नाममात्र शुल्क आकारण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे विद्यापीठ प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा परिसर तब्बल 411 एकर इतका आहे. विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशदारापासून मुख्य इमारतीपर्यंतचे अंतर साधारण 2 किलाेमीटर इतके आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना चांगलीच पायपीट करावी लागत हाेती. तसेच विद्यापीठात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना देखील अडचण येत हाेती. विद्यापीठाला एमएनजीएलकडून दाेन बसेस देणगी म्हणून देण्यात आल्या आहेत. या बसेस विद्यापीठात सेवा देणार आहेत.
या बसेसचा मार्ग पुढालप्रमाणे - मुख्य प्रवेशद्वार, जैव तंत्रज्ञान विभाग, भौतिकशास्त्र विभाग, जयकर ग्रंथालय, परीक्षा विभाग, सेट / परीक्षा विभाग, प्रशासकीय इमारत, कुलगुरू कार्यालय, टपाल कार्यालय, मुलींचे वसतिगृह, शिवाजी महाराज पुतळा, मुख्य प्रवेशद्वार.
या सेवेचा जास्तीत जास्त विद्यार्थी, प्राध्यापक व सेवकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.