पुणे : राज्य शासनाने १ एप्रिलपासून व्हॅट कमी केल्याने ६ रुपये ३० पैशांनी सीएनजीचे प्रति किलोचे दर कमी केले होते. त्यामुळे वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र,पाच दिवसांत पुन्हा सीएनजीचे दर वाढविण्यात येणार आहे. पुणे शहरात बुधवार (दि. ६) मध्यरात्रीपासून सीएनजीचे प्रति किलो ६ रुपयांनी पुन्हा वाढणार असल्याने ग्राहकांना आता ६८ रुपये मोजावे लागणार आहे. त्यामुळे व्हॅट कमी केल्याचा दिलासा औट घटकेचा ठरला आहे.
सीएनजीचे दर बुधवार (दि. ६) मध्यरात्रीपासून शहरात ६२.२० रुपये प्रति किलोवरून ६८ रुपये प्रति किलोपर्यंत वाढणार आहेत. या प्रचंड वाढीचे मुख्य कारण म्हणजे सीएनजी गॅसच्या मिश्रणात एका विशिष्ट आयात करण्यात येणाऱ्या वायूच्या वाढीचे आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या विशिष्ट गॅसची आंतरराष्ट्रीय किंमत दुप्पट झाली आहे. त्यामुळे ही एकदम मोठी दरवाढ करण्यात येत असल्याचे ऑल इंडिया पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे प्रवक्ते अली दारुवाला यांनी सांगितले.
अर्थसंकल्पात जाहीर केल्याप्रमाणे राज्यातील ‘सीएनजी’, ‘पीएनजी’ सारख्या नैसर्गिक गॅसवरील मुल्यवर्धीत कराचा (व्हॅट) दर १ एप्रिल २०२२ पासून १३.५ टक्क्यांवरुन ३ टक्क्यांपर्यंत कमी झाल्याने राज्यात घराघरांमध्ये पाईपद्वारे मिळणारा स्वयंपाकाचा गॅस तसेच वाहनांसाठीचे सीएनजी इंधन स्वस्त झाले होते. पुणे आणि परिसरात सीएनजी प्रतिकिलो ६ रुपये ३० पैशांनी स्वस्त झाला होता. मात्र, या निर्णयाचा फायदा ग्राहकांसाठी औट घटकेचा ठरला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या विशिष्ट वायूची किंमत जोपर्यंत कमी होत नाही. तोपर्यंत दर असेच राहणार असल्याचे अली दारुवाला यांनी सांगितले.