पुणे : रशिया-युक्रेन युद्धाचे कारण देत युरोपीय देशांनी अरबी देशांकडून ४० डॉलर प्रति सिलिंडर या दराने गॅस खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. आधीच्या किमतीच्या ही दुप्पट आहे. घरगुती नैसर्गिक वायूच्या खर्चात वाढ झाली आहे. त्यामुळे सीएनजीची दरवाढ सुरूच आहे.
मागील दोन महिन्यांत सीएनजीचे दर सातत्याने वाढत आहेत. बुधवारी (दि. ८) पुणे शहरात सीएनजीचे दर आणखी दोन रुपयांनी वाढवले आहेत. पुण्यात आता हे दर ८२ रूपये प्रतिकिलो झाल्याने पेट्रोल आणि डिझेलची बरोबरी आता सीएनजी करणार का, असा सवाल वाहनचालक संभाजी कदम, संदीप पाठारे, अरूण दाभाडे यांनी केला आहे.
युरोपीय देशांनी युक्रेनला रशियाच्या विरोधात पाठिंबा दिल्याने रशियाने युरोपीय देशांचा अचानक गॅस पुरवठा बंद केला आहे. अरब देशांकडून दरवाढ झाल्याने आपल्याकडील दरावर परिणाम झाला आहे. यामुळे पुणे शहरात सीएनजी बुधवारपासून (दि. ८) २ रुपयांनी सीएनजी महाग झाला आहे. मागील महिन्यातही १९ मे रोजी २ रुपयांनी वाढ केली होती.