पुणे : आंतरराष्ट्रीय बाजारात सीएनजीच्या मिश्रणासाठी लागणाऱ्या विशिष्ट वायूच्या दरात दुप्पट वाढ झाल्याचे कारण देत बरोबर आठवडाभरापूर्वी ६ रुपयांनी महाग झाला होता. हेच कारण देत बुधवारी (दि. १३) मध्यरात्रीपासून सीएनजीच्या प्रतिकिलोच्या दरात पुन्हा ५ रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे पुणे शहरात आता सीएनजीचा दर प्रतिकिलो ७३ रुपये झाला आहे. एका आठवड्यात तब्बल ११ रुपयांनी वाढ झाल्याने वाहनचालकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
राज्य शासनाने १ एप्रिलपासून व्हॅट कमी केल्याने ६ रुपये ३० पैशांनी सीएनजीचे प्रति किलोचे दर कमी केले होते. त्यामुळे वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र, आठवड्यात दोनदा दरवाढ करण्यात येत आहे.
सीएनजीचे दर बुधवार (दि. १३) मध्यरात्रीपासून शहरात ६८ रुपये प्रति किलोवरून ७३ रुपये प्रति किलोपर्यंत वाढणार आहेत. या प्रचंड वाढीचे मुख्य कारण म्हणजे सीएनजी गॅसच्या मिश्रणात एका विशिष्ट आयात करण्यात येणाऱ्या वायूच्या वाढीचे आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या विशिष्ट गॅसची आंतरराष्ट्रीय किंमत दुप्पट झाली आहे. त्यामुळे ही एकदम मोठी दरवाढ करण्यात येत असल्याचे ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे प्रवक्ते अली दारुवाला यांनी सांगितले.