लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: सहकारी संस्थांच्या निवडणूकांमध्ये खर्चात काटकसर करून अन्य निवडणूकांप्रमाणेच याही निवडणुका भयमुक्त, निपक्षपाती वातावरणात घ्याव्यात अशी सुचना राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात डॉ. पाटील यांनी सहकार खात्यातील विविध विभागांच्या अधिकारी कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. त्यांच्या साह्यानेच ही निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे. राज्यातील सर्व विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था (प्रशासन), सर्व प्रादेशिक सहसंचालक (साखर), सर्व प्रादेशिक उप आयुक्त (वस्त्रोद्योग) व सर्व विभागीय उपनिबंधक (दुग्ध), जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी व जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी बैठकीला उपस्थित होते.
कोरोनामुळे थांबलेल्या ३ हजारांपेक्षा जास्त सहकारी संस्थांच्या निवडणूका पहिल्या टप्प्यात घेण्यात येत आहेत. १५ फेब्रुवारीपासून ही प्रक्रिया सुरू होईल. निवडणूक घेताना कोरोनापासून बचावाची सर्व काळजी घ्यावी, सरकारने दिलेल्या सर्व प्रकारच्या मार्गदर्शक सुचनांचे काटेकोर पालन निवडणूकी करून घ्यावे असे डॉ. पाटील यांनी सांगितले.
निवडणूक प्रक्रियेकरता मनुष्यबळ कमी पडणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. एकाच वेळी सर्व निवडणूका होणार असल्याने कदाचित अधिक संख्येने कर्मचाऱ्यांची गरज भासेल. अशा वेळी सरकारच्या अन्य विभागातील अधिकारी, कर्मचारी यांची सेवा तात्पुरत्या स्वरूपात वर्ग करून घ्यावी. तशी सुचना संबधित विभागांना दिल्याचे पाटील म्हणाले.