पुणे : चर्तुःश्रृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका नायजेरियन जोडप्यांकडून कोकेन, एम डी अशा प्रकारच्या अंमली पदार्थ विक्री प्रकरणी ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून तब्बल एक कोटी एकतीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी उगुचुकु इम्यॅन्युअल (वय ४३ वर्षे, रा. नालंदा गार्डन रेसीडन्सी, बाणेर पुणे, मूळ देश : नायजेरियन) व त्याची पत्नी ऐनीबेली ओमामा व्हिवान (वय :३० वर्षे) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या नायजेरियन जोडप्यांची नावे आहेत. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक शैलजा जानकर यांनी फिर्याद दिल्याने या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखेच्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बाणेर येथील नालंदा गार्डन या सोसायटीत राहणारे एक नायजेरियन जोडपे घरातुन कोकेन, एम डी असे अंमली पदार्थाची मोठया प्रमाणावर विक्री करीत असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखेकडे नेमणुकीस असलेले पोलीस अंमलदार मारुती पारधी यांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक पोलिस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, शैलजा जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली याठिकाणी छापा कारवाई केली. त्यांच्याकडून ६४४ ग्रॅम (एम डी) मॅफेड्रॉन कि रु ९६,६०,०००/- व २०१ ग्रॅम १२० मिलीग्रॅम कोकेन कि रु ३०,१६,८००/- व रोख रुपये ०२,१६,०००/- मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक वजन काटा, प्लास्टिक पिशव्या व डब्या असा ०२, १६,०००/- चा असा एकुण एक कोटी एकतीस लाख आठ हजार आठशे रुपयांचा अंमली पदार्थ व ऐवज हस्तगत करून जप्त करण्यात आला आहे.
कपड्यांचा व्यवसाय करीत असल्याचे सांगत...
बाणेर परिसरात राहणारे हे नायजेरियन जोडपे सहसा जास्त कुणाच्या संपर्कात नव्हते. सोसायटीतील लोकांनी विचारले असता ते कपड्यांचा व्यवसाय करीत असल्याचे सांगत असत. मात्र त्यांच्या संपर्कात कुणी त्यांचे महाराष्ट्रीयन मित्र - मैत्रिणी आहेत का, याबाबत पोलीस तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहायक पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) श्रीनिवास घाडगे, सहायक पोलिस आयुक्त गुन्हे १ गजानन टोम्पे यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक, १ गुन्हे शाखा पुणे शहर येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सपोनि लक्ष्मण ढेंगळे, शैलजा जानकर, पोलीस अंमलदार मारुती पारधी, मनोज साळुंके, राहुल जोशी, पांडुरंग पवार, विशाल दळवी, संदिप शिर्के, प्रविण उत्तेकर, सचिन माळवे, रेहना शेख, संदेश काकडे, नितेश जाधव, योगेश मोहिते यांनी केली आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे करीत आहेत.